चेन्नई : कोरोनामुळे अनेक देशांनी प्रवास करण्यावर निर्बंध घातल्यामुळे जर्मनीत अडकलेला भारताचा माजी जगज्जेता बुद्धिबळपटू अखेर तीन महिन्यांच्या कालावधीनंतर मायदेशी परतला आहे. बुंडेसलीगा बुद्धिबळ लीगमध्ये खेळण्यासाठी आनंद फेब्रुवारी महिन्यात जर्मनीत दाखल झाला होता. मार्च महिन्यात तो भारतात परतणार होता. पण कोरोनाचे संकट उद्भवल्यानंतर आनंदला जर्मनीतच अडकून राहावे लागले.
पण एअर इंडियाच्या विमानाने आनंद फ्रँकफर्ट ते दिल्ली आणि नंतर बंगळुरूतील केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ असा प्रवास करून शनिवारी मध्यरात्री मायदेशी पोहोचला. आनंद परतल्याच्या वृत्ताला पत्नी अरुणा हिने दुजोरा दिला आहे. ‘‘आनंद परतला असून त्याची प्रकृती ठणठणीत आहे. ब-याच कालावधीनंतर तो परतल्याने आम्हाला आनंद झाला आहे,’’ असे अरुणा हिने सांगितले.
Read More ‘मन की बात’; ट्रॅक्टरद्वारे गावात सॅनिटायझरची फवारणी करणाऱ्या नाशिकच्या शेतकऱ्याचे कौतुक
नियमानुसार कर्नाटकमध्ये पोहोचल्यावर त्याला सात दिवस विलगीकरण कक्षात राहावे लागणार आहे. चाचणीचा अहवाल नकारात्मक आल्यानंतर त्याला घरी १४ दिवसांच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात येईल. फ्रँकफर्टमध्ये अडकलेला आनंद नंतर रशियामधील कँडिडेट्स बुद्धिबळ स्पर्धेचे समालोचन करत होता. याचदरम्यान तो या महिन्यात सुरुवातीला झालेल्या नेशन्स चषक आॅनलाईन बुद्धिबळ स्पर्धेतही खेळला होता. जर्मनीत अडकला तरीही तो कुटुंबाच्या सातत्याने संपर्कात होता. बुद्धिबळविषयक कामात तो स्वत:ला नेहमी व्यग्र ठेवायचा.