ढाका : भारताने बांगलादेशचा पहिला डाव पहिल्याच दिवशी २२७ धावांवर संपवला. भारताकडून उमेश यादवने ४ तर अश्विनने ४ विकेट्स घेत बांगलादेशच्या फलंदाजीचे कंबरडे मोडले. १२ वर्षानंतर कसोटीत पुनरागमन करणा-या जयदेव उनाडकटनेही २ विकेट्स घेतल्या. बांगलादेशकडून मोमिनूल हकने झुंजार खेळी करत ८४ धावा केल्या. भारताने दिवसअखेर आपल्या पहिल्या डावात बिनबाद १९ धावा केल्या. उमेश यादवने आजच्या सामन्यात भागीदारी तोडण्याचे काम केले. उमेश यादवने तो आशियाई खेळपट्ट्यांवर भारताचा सर्वात चांगला गोलंदाज असल्याचे पुन्हा एकदा दाखवून दिले.
दुस-या कसोटीत बांगलादेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. मात्र भारतीय गोलंदाजांनी बांगलादेशला धक्क्यावर धक्के देण्यास सुरुवात केली. तब्बल १२ वर्षानंतर कसोटी संघात परतलेल्या जयदेव उनाडकट आणि आर. अश्विनने भेदक मारा करत बांगलादेशची टॉप ऑर्डर उडवली. उमेश यादवनेही या दोघांना चांगली साथ देत पहिल्या दिवसाच्या दुस-या सत्रापर्यंत बांगलादेशची अवस्था ५ बाद १७२ धावा अशी केली. चहापानाला खेळ थांबला, त्यावेळी बांगलादेशच्या ५७ षटकात ५ बाद १८४ धावा झाल्या होत्या.
चहापानानंतर मोमिनूल हकने बांगलादेशला २०० चा टप्पा पार करून दिला. मात्र, ब्रेकनंतर भारताच्या उमेश यादवने बांगलादेशला दोन धक्के देत त्यांचा डाव गुंडाळण्याच्या प्रक्रियेला वेग दिला. त्याने मेहदी हसन मिराजला १५ तर नुरूल हसनला ६ धावांवर बाद करत बांगलादेशची अवस्था ७ बाद २१९ अशी केली. उमेश यादवने चहापानानंतर बांगलादेशला धक्के देणे सुरूच ठेवले. त्याने टस्किन अहमदला १ धावांवर बाद करत आपला चौथा बळी टिपला. अश्विनने बांगलादेशचा झुंजार फलंदाजी करणा-या मोमुनिल हकला ८४ धावांवर बाद करत मोठा धक्का दिला. त्यानंतर खालेद अहमदला शुन्यावर बाद करत बांगलादेशचा डाव २२७ धावांवर संपवला. अश्विनने ७१ धावात ४ तर उमेश यादवने २५ धावात ४ बळी टिपले. त्यांना जयदेव उनाडकटने २ विकेट घेत चांगली साथ दिली.