27.4 C
Latur
Tuesday, November 29, 2022
Homeक्रीडाबीसीसीआय आयोजित करणार निरोपाचा सामना : धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

बीसीसीआय आयोजित करणार निरोपाचा सामना : धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी

एकमत ऑनलाईन

नवी दिल्ली : १५ ऑगस्ट २०२० ही तारीख धोनी चाहत्यांसाठी धक्का देणारी ठरली. पण, धोनीच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी समोर आली आहे. भारतीय क्रिकेटसाठी धोनीचे योगदान लक्षात घेता भारतीय क्रिकेट नियामक मंडळ निरोपाचा सामना आयोजित करण्याच्या विचारात आहे.

वन डे, ट्वेंटी-२० वर्ल्ड कप आणि चॅम्पियन्स ट्रॉफी या आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा जगातला एकमेव कर्णधार आहे धोनी. ४० वर्षांत ऑस्ट्रेलियाला कसोटीत व्हाईटवॉश कुणी दिला नव्हता, तो धोनीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने विक्रम नोंदवला. याशिवाय त्याच्या नावावर अनेक वर्ल्ड रेकॉर्ड आहेत. अशा या विक्रमादित्य धोनीसाठी निरोपाचा सामना आयोजित करायलाच हवा, अशी मागणी जोर धरत आहे.

चाहत्यांच्या भावनांचा आदर राखताना, बीसीसीआय धोनीसाठी निरोपाच्या सामन्याचे आयोजन करण्याच्या विचारात आहे. बीसीसीआयच्या एका अधिका-याने सांगितले की, सध्या आंतरराष्ट्रीय मालिका नाही, परंतु आयपीएलनंतर आम्ही काय करू शकतो, याचा विचार करत आहोत. धोनीचे भारतीय संघासाठीचे योगदान अमूल्य आहे आणि त्याला तो सन्मान मिळायलाच हवा. त्याने निवृत्तीचा सामना खेळावा, अशी आमचीही इच्छा होती. पण, धोनी वेगळा खेळाडू आहे आणि कोणाच्या ध्यानीमनी नसताना त्याने निवृत्तीची घोषणा केली.

धोनीच्या निवृत्तीबद्दल साक्षीला देखील कल्पना नव्हती?
नवी दिल्ली : देशाला आयसीसीच्या तीन मोठ्या स्पर्धांचे विजेतेपद मिळवून देणा-या महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी इन्स्टाग्राम पोस्टवरून एक व्हीडीओ पोस्ट करत ही घोषणा केली. धोनीच्या या निवृत्तीबद्दल त्याच्या सर्वांत जवळच्या मित्राने एक मोठी माहिती दिली आहे. संध्याकाळी ७ वाजून २९ मिनिटांपासून मला निवृत्त समजा, असा मेसेज धोनीने टाकला.

त्यानंतर धोनीची पत्नी साक्षीने देखील त्यासाठी इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली. धोनीच्या चाहत्यांना हे ऐकून धक्का बसेल की इतक्या मोठ्या निर्णयाबद्दल पत्नी साक्षीला देखील कल्पना नव्हती. धोनीचा जवळचा मित्र आणि त्याच्यासोबत शाळेत क्रिकेट खेळणारा गौतम उपाध्यायने सांगितले की, क्रिकेट संदर्भात सर्व निर्णय धोनी मनात ठेवतो. त्यासंदर्भात तो कधीच कोणाशी चर्चा करत नाही. मी धोनीला २५ वर्षांपासून ओळखतो.

कोरोनाने संपवले धोनीचे करिअर : चहल
नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर करून आता चार दिवस होत आले तरी चाहत्यांना आशा होती की तो पुन्हा मैदानावर दिसेल. आयपीएलनंतर भारतीय संघातून टी-२० वर्ल्ड कपनंतरच धोनी निवृत्ती घेईल असे वाटत होते. पण त्याआधीच धोनीने निवृत्ती जाहीर केली. धोनीच्या निवृत्तीसंदर्भात बोलताना टीम इंडियातील एका खेळाडूने त्याचे करिअर कोणी संपवले याचा खुलासा केलाय. एका टीव्ही कार्यक्रमा दरम्यान बोलताना युजवेंद्र चहल म्हणाला, धोनीचे करिअर कोरोना व्हायरसने संपवले. कोरोना नसता तर तो निश्चितपणे टी-२० वर्ल्ड कप खेळला असता. कुलदीप यादव आणि माझ्या करिअरमध्ये धोनीचे खूप मोठे योगदान आहे.

स्व. सुधाकरपंत परिचारक यांच्या अस्थिकलशाचे चंद्रभागेत विसर्जन

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या