मुंबई : महाराष्ट्रामध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे, त्यामुळे राज्य सरकारने कठोर निर्णय घेतले आहेत. संध्याकाळी ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बाहेर फिरण्यावर निर्बंध घालण्यात आले आहेत. या काळात ५ पेक्षा जास्त लोक एकत्र येण्यावर बंदी घालण्यात आली आहे. हे नियम १५ एप्रिलपर्यंत लागू राहणार आहेत, पण जर रुग्णसंख्या वाढली तर आणखी काही बदल केले जाऊ शकतात. महाराष्ट्र सरकारच्या या निर्बंधांचा आयपीएलवर परिणाम होणार का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. आयपीएलच्या या मोसमातले १० सामने मुंबईतही आयोजित करण्यात आले आहेत.
महाराष्ट्र सरकारच्या नव्या नियमांनुसार रात्री ८ पासून सकाळी ७ वाजेपर्यंत कोणालाही एकत्र येता येणार नाही. याशिवाय बागा, समुद्र किना-यांवर फिरायला निर्बंध असतील. सिनेमा हॉल, मॉल, ऑडिटोरियम रात्री ८ ते सकाळी ७ वाजेपर्यंत बंद असतील. मुंबईमध्ये आयपीएलचे सामने प्रेक्षकांशिवाय खेळवायला आधीच परवानगी दिली आहे, त्यामुळे या सामन्यांचं भवितव्य काय, हे लवकरच स्पष्ट होईल.
क्रिकेट सामने बंद दरवाजाआड म्हणजेच प्रेक्षकांशिवाय होणार आहेत, त्यामुळे यावर परिणाम होणार नाही. एवढेच नाही तर खेळाडू आणि कर्मचारी आधीपासूनच बायो-बबलमध्ये आहेत, असे महाराष्ट्र सरकारमधल्या एका वरिष्ठ अधिका-यांनी सांगितले. आयपीएलच्या मुंबईत होणा-या सामन्यांबाबत बीसीसीआय किंवा महाराष्ट्र सरकारकडून अजूनही अधिकृत काहीही सांगण्यात आलेलं नाही. आयपीएल सामने संध्याकाळी ७ वाजता सुरू होणार आहेत, तर प्रतिबंध ८ पासून लावण्यात आले आहेत.
आयपीएलचा १४ वा मोसम ९ एप्रिलपासून सुरू होणार आहे. मुंबई आणि बंगळुरू यांच्यामध्ये चेन्नईत पहिला सामना होईल. तर मुंबईत १० एप्रिलला चेन्नई आणि दिल्लीचा सामना होईल. कोरोनामुळे यावर्षी मुंबई, चेन्नई, बंगळुरू, दिल्ली, कोलकाता आणि अहमदाबादमध्येच आयपीएल सामने खेळवण्यात येणार आहेत. तसेच कोणत्याही टीमला घरच्या मैदानात सामना खेळता येणार नाही. सध्या चेन्नई, पंजाब, दिल्ली आणि कोलकाता या टीम मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर सराव करणार आहेत. याच स्टेडियमवर या चारही टीम सामने खेळणार आहेत.
२ तारखेनंतर मुख्यमंत्री लॉकडाऊनबद्दल निर्णय घेतील