पुणे : सध्या आयपीएलचा थरार सुरू आहे. क्रिकेटप्रेमी आयपीएलचा रोमांच अनुभवत आहेत. त्याच वेळी दुसरीकडे आयपीएलवर सट्टा लावणारे बुकी जोरदार कमाई करत आहेत. या बुकींवर कारवाईसाठी पोलिसांच्या टीमचे लक्ष केंद्रित केले आहे.
पुणे शहरात आयपीएलवर सट्टा लावणारे पोलिसांच्या जाळ्यात आले आहेत. शनिवारी झालेल्या चेन्नई आणि मुंबई इंडियन्स सामन्यादरम्यान सट्टा लावणा-यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. या प्रकरणी ९ जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे गुन्हे शाखेने ही कारवाई केली आहे.
शनिवारी चेन्नई आणि मुंबई इंडियन्स यांच्यात सामना सुरू होता. यावेळी सर्वच जण सामन्याचा रोमांच अनुभवत होते. दुसरीकडे पुणे शहरातील कोंढवा परिसरातील ब्रह्मा अंगण बिल्डिंगमध्ये बुकी आयपीएलवर सट्टा घेत होते.
पोलिसांना याची माहिती मिळाली. मग पोलिसांनी सापळा रचत आयपीएलवर सट्टा घेणा-या ९ जणांना अटक केली. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने ही कारवाई केली. यावेळी पाच लाखांचा मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. कोंढवा पोलिस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.