नाशिक : माजी फिरकीपटू तथा खासदार हरभजन सिंगने नाशिकमध्ये येत स्वत: जेवण बनवत पिठले-भाकरीचा भाकरीचा आस्वाद घेतला. विशेष म्हणजे भज्जीने या पिठले-भाकरीचे तोंडभरून कौतुक करत आस्वाद घेण्यासाठी ‘पुन्हा येईन’ असेही त्याने सांगितले.
फिरकीपटू म्हणून ओळख असलेला आणि चांगल्या चांगल्या फलंदाजांचा त्रिफळा उडविणारा हरभजन सिंग सध्या राजकारणात सक्रिय आहे. दरम्यान अनेकदा तो राज्यसभेत दिसतो. यातून वेळ काढत हरभजन सिंग नुकताच नाशिकमध्ये आला होता. यावेळी त्याने त्र्यंबक रोडवरील हॉटेल संस्कृतीला भेट देत स्वत: जेवण बनवले. तसेच पिठले-भाकरीचा आस्वाद घेतला.
दरम्यान नाशिकच्या पूजाविधीसाठी प्रसिध्द असलेल्या त्र्यंबकेश्वरला त्याने भेट दिली. यावेळी येथील शिखरे गुरुजींच्या माध्यमातून पूजा केल्याचे समजते. पूजा केल्यानंतर हरभजन सिंगने नाशिक-त्र्यंबक रस्त्यावरील बेळगाव ढगा परिसरात हॉटेल संस्कृतीमध्ये जेवण केले. यावेळी त्याने स्वत: किचनमध्ये जात चुलीवर जेवण कसे बनवितात? चूल कशी पेटवितात? याविषयी जाणून घेतले. शिवाय महाराष्ट्राचा प्रसिद्ध मेनू असलेला पिठले- भाकरी त्याने बनवून आस्वाद घेतला.
जेवणानंतर त्याने या मेनूचे तोंडभरून कौतुक केले. यावेळी हॉटेलचे संचालक दिग्विजय मानकर यांनी त्याचे स्वागत केले.