लंडन : जागतिक बुद्धिबळदिनी जागतिक विजेतेपदाची लढत न खेळण्याचा निर्णय जगज्जेत्या मॅग्नस कार्लसनने घेतला. पाचवेळा जागतिक विजेतेपद जिंकलेल्या कार्लसनने मला आता जिंकण्यासारखे काहीच राहिलेले नाही, असे सांगत आपला निर्णय जाहीर केला.
बुद्धिबळात आता मला कमावण्यासारखे काही नाही. मला विजेतेपदाची लढत खेळणेही फारसे आवडत नाही. आगामी जगज्जेतेपदाची लढत नक्कीच रंगतदार होईल, अशी अपेक्षा आहे. मला आता खेळण्याची इच्छाच वाटत नाही, त्यामुळे मी खेळणार नाही, असे कार्लसनने सांगितले. मी या निर्णयापूर्वी दीर्घ विचार केला आहे. खरे तर एक वर्षापेक्षा जास्त विचार करीत होतो. जागतिक विजेतेपदाच्या लढतीपूर्वीपासून हे विचार माझ्या मनात घोळत होते, असेही तो म्हणाला.
विश्वनाथन आनंदची जागतिक विजेतेपदावरील हुकूमत कार्लसनने संपुष्टात आणली. तेव्हापासून तो जगज्जेता आहे. जगज्जेतेपदाची लढत न खेळण्याचा अंतिम निर्णय घेण्यापूर्वी सहका-यासह चर्चा केली. जागतिक महासंघासही याची कल्पना दिली होती. जागतिक लढत पुन्हा खेळण्यासाठी मीच प्रेरीत नाही, हेच खरे आहे, असे कार्लसनने सांगितले. कार्लसन जगज्जेतेपद लढत खेळणार नसला तरी तो विविध स्पर्धा खेळणार आहे, जागतिक बुद्धिबळ महासंघाचे अध्यक्ष अकादी द्वोकोविच यांनीच ही माहिती दिली. कार्लसन जागतिक विजेतेपदाच्या पाच लढती खेळला आहे, त्यावेळी तो किती तणावाखाली होता, हे काहीच जण सांगू शकतील, असेही ते म्हणाले.