22.5 C
Latur
Wednesday, December 8, 2021
Homeक्रीडाचेन्नईने लुटले विजयाचे सोने

चेन्नईने लुटले विजयाचे सोने

एकमत ऑनलाईन

दुबई : फाफ डु प्लेसिसचे दमदार अर्धशतक, शार्दुल ठाकूरचा भेदक मारा आणि रवींद्र जडेजाची क्षेत्ररक्षणासोबत उपयुक्त गोलंदाजी यामुळे चेन्नई सुपर किंग्जने कोलकाता नाइट रायडर्सला २७ धावांनी धूळ चारत आयपीएलचे चौथे विजेतेपद नावावर केले. दुबईच्या मैदानावर रंगलेल्या महामुकाबल्यात चेन्नईचा कप्तान महेंद्रसिंग धोनीने अनुभवाचा पुरेपूर वापर करत महत्त्वाच्या क्षणी सामन्याला कलाटणी दिली. त्यामुळे विजयादशमीच्या मुहुर्तावर चेन्नईने विजयाचे सोने लुटत आयपीएलमधील चॅम्पियनशीपचा चौकार लगावला.

नाणेफेक गमावलेल्या चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना कोलकातासमोर २० षटकात ३ बाद १९२ धावा केल्या. सलामीवीर फाफ डु प्लेसिसने तडाखेबंद ८६ धावांची खेळी केली. त्याला ऋतुराज, उथप्पा आणि मोईन अलीची योग्य साथ मिळाली. प्रत्युत्तरात कोलकाताचे सलामीवीर व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी ९१ धावांची दमदार सलामी दिली. पण मधल्या फळीत फलंदाजांनी घेतलेल्या दबावामुळे कोलकाता आपल्या तिस-या जेतेपदापासून लांब राहिला. त्यांना २० षटकात ९ बाद १६५ धावांपर्यंतच पोहोचता आले.

चेन्नईच्या १९३ धावांच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी मैदानात उतरलेल्या कोलकात्याच्या व्यंकटेश अय्यर आणि शुबमन गिल यांनी दमदार सुरुवात केली. पहिल्या ६ षटकांच्या पॉवरप्लेमध्ये त्यांनी ५५ धावा उभारल्या. १० व्या षटकात अय्यरने ३१ चेंडूत आपले अर्धशतक फलकावर लावले. याच षटकात शुबमनला जडेजाला रायुडूकरवी झेलबाद केले. पण शुबमनने मारलेला चेंडू स्पायडर कॅमे-याला बसल्यामुळे तो चेंडू डेड ठरवण्यात आला. १० षटकात कोलकाताने बिनबाद ८८ धावा केल्या. ११ व्या षटकात वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकूरने चेन्नईला पहिले यश मिळवून दिले. त्याने अर्धशतकवीर अय्यरला माघारी पाठवले. रवींद्र जडेजाने त्याचा अप्रतिम झेल टिपला.

अय्यरने ३२ चेंडूत ५ चौकार आणि ३ षटकारांसह ५० धावा केल्या. अय्यरनंतर मैदानात आलेल्या नितीश राणाला शार्दुलने भोपळाही फोडू दिला नाही. राणानंतर सुनील नरेन, दिनेश कार्तिक आणि ईऑन मॉर्गन यांना मोठी खेळी करता आली नाही. अर्धशतक ठोकलेल्या शुबमनला दीपक चहरने पायचीत पकडत चेन्नईला चौथे यश मिळवून दिले. शुबमनने ६ चौकारांसह ५१ धावा केल्या. या पडझडीनंतर मात्र चेन्नईने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले. त्यामुळे कोलकात्याला २० षटकात ९ बाद १६५ धावांपर्यंतच पोहोचता आले. चेन्नईकडून शार्दुल ठाकूरने तीन, जोश हेझलवुड आणि रवींद्र जडेजा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले.

तत्पूर्वी चेन्नईचे सलामीवीर ऋतुराज गायकवाड आणि फॅफ डु प्लेसिस कोलकाताच्या गोलंदाजांवर तुटून पडले. ऋतुराजने ३ चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर ३२ धावा केल्या. त्यानंतर ऋतुराज बाद झाला. त्यानंतर फॅफ डु प्लेसिसने अर्धशतक झळकावत केकेआरच्या गोलंदाजीचा चांगलाच समाचार घेतला. यावेळी फॅफला रॉबिन उथप्पाची चांगली साथ मिळाली. उथप्पाने फक्त १५ चेंडूंत तीन षटकारांच्या जोरावर ३१ धावांची आक्रमक खेळी साकारली. पण सुनिल नरेनने उथप्पाला बाद केले. त्यानंतर फॅफने आक्रमक फलंदाजी सुरूच ठेवत केकेआरच्या गोलंदाजीवर तो प्रहार करत राहिला. त्यानंतर मोइन अली फलंदाजीला आला आणि त्यानेही फॅफला चांगली साथ दिली. त्यामुळे चेन्नईने निर्धारित षटकांत १९२ धावांपर्यंत मजल मारली. धावांचा डोंगर उभा केल्यानेच चेन्नईचा विजय सुकर झाला.

धोनीचा नवा विक्रम
चेन्नई सुपर किंग्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२१ स्पर्धेतील अंतिम फेरीचा सामना आज रंगला. या सामन्यात चेन्नईचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. नाणेफेकीचा कौल झाल्यानंतर महेंद्रसिंग धोनीने नवा विक्रम प्रस्थापित केला. टी २० स्पर्धेत ३०० व्या सामन्याचे महेंद्रसिंग धोनीने नेतृत्व केले. धोनी २००७ पासून टीम इंडिया, चेन्नई सुपर किंग्स, इंडियन्स आणि रायझिंग पुणे संघाचे नेतृत्व केले आहे.

 

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
193FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या