18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडाचेन्नईच सुपर, अंतिम फेरीत धडक

चेन्नईच सुपर, अंतिम फेरीत धडक

एकमत ऑनलाईन

दुबई : महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने विक्रमी ९ व्यांदा आयपीएलच्या अंतिम फेरीत प्रवेश केला. क्वॉलिफायनल १ च्या लढतीत अंतिम षटकापर्यंत रंगलेल्या सामन्यात चेन्नईने दिल्ली कॅपिटल्सचा पराभव केला. अखेरच्या क्षणी आलेल्या महेंद्रसिंग धोनी याने जोरदार फटकेबाजी करून विजयश्री खेचून आणत अजूनही आपण फिनिशर असल्याचे दाखवून दिले.

फायनलमध्ये पोहोचण्यासाठी चेन्नईला विजयासाठी १७३ धावांचे आव्हान होते. चेन्नईची सुरूवात अतिशय खराब झाली. पहिल्या षटकातील चौथ्या चेंडूवर सलामीवीर फाफ डुप्लेसिसला नॉर्जेने बोल्ड केले. पण त्यानंतर आलेल्या रॉबिन उथप्पा आणि ऋतुराज गायकवाड यांनी दुस-या विकेटसाठी ११० धावांची भागिदारी केली. उथप्पाने दिल्लीच्या गोलंदाजांची चांगली धुलाई केली. त्याने वेगाने अर्धशतक पूर्ण केले. चेन्नईने सामन्यावर पकड मिळवली असताना श्रेयस अय्यरने सीमारेषेवर उथप्पाचा शानदार कॅच घेतला. उथप्पाने ४४ चेंडूत ७ चौकार आणि २ षटकारांसह ६३ धावा केल्या. त्यानंतर शार्दूल ठाकूरला फलंदाजीला पाठवण्यात आले. पण तो पहिल्या चेंडूवर बाद झाला, तर त्याच्या जागी आलेला रायडू धावबाद झाला.

एका पाठोपाठ ३ विकेट पडल्याने चेन्नईची अवस्था १ बाद ११२ वरून ४ बाद ११९ अशी झाली. १९ व्या षटकात पहिल्या चेंडूवर आवेश खानने ऋतुराज गायकवाडला बाद केले. त्याने ५० चेंडूत ५ चौकार आणि २ षटकारांसह ७० धावा केल्या. त्यानंतर १९ व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर मोक्याच्या क्षणी मोईन अलीही बाद झाला. शेवटच्या षटकात ५ बॉल १३ धावा अशी स्थिती होती. त्यावेळी धोनीने एक बाजू लावून धरत जोरदार फटकेबाजी केली. त्याने तीन चौकार ठोकले आणि एक अतिरिक्त धाव मिळाल्याने चेन्नईने शानदार विजय मिळविला.

तत्पूर्वी शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी दिल्लीच्या डावाची सुरुवात केली. दीपक चहरने टाकलेल्या तिस-या षटकात पृथ्वीने चार चौकार ठोकत आपला आक्रमक अंदाज दाखवला. चौथ्या षटकात जोश हेझलवूडने सलामीवीर शिखर धवनला यष्टीपाठी झेलबाद करत दिल्लीला पहिला धक्का दिला. धवन ७ धावांवर माघारी परतला. धवननंतर आलेला श्रेयस अय्यर अपयशी ठरला. पॉवरप्लेच्या शेवटच्या षटकात धोनीने हेझलवूडला गोलंदाजी दिली. त्याने अय्यरला तंबूत पाठवत त्याचा विश्वास सार्थ ठरवला. अय्यरला एक धाव करता आली. नवव्या षटकात पृथ्वीने जडेजाला चौकार खेचत २७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. ११ व्या षटकात रवींद्र जडेजाला मोठा फटका खेळण्याच्या नादात पृथ्वीने डु प्लेसिसच्या हाती सोपा झेल दिला. पृथ्वीने ३४ चेंडूत ७ चौकार आणि ३ षटकारांसह ६० धावा केल्या.

त्यानंतर शिमरोन हेटमायर आणि ऋषभ पंत यांनी १४ व्या षटकात दिल्लीचे शतक फलकावर लावले. या दोघांनी दिल्लीच्या डावाला आकार दिला. हेटमायर-पंतने १७ व्या षटकात अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. पंतने २० व्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने ३ चौकार आणि २ षटकारांसह नाबाद ५१ धावा केल्या. २० षटकात दिल्लीने ५ बाद १७२ धावा केल्या होत्या. मात्र, चेन्नई सुपरकिंग्जने हे आव्हान पेलत शानदार विजय मिळवून अंतिम फेरीत धडक मारली. चेन्नईकडून हेजलवुडने सर्वाधिक २ तर जडेजा, मोईन अली आणि ब्रावो यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या