24 C
Latur
Tuesday, October 19, 2021
Homeक्रीडाचेन्नई सुपरकिंग्ज सुसाट

चेन्नई सुपरकिंग्ज सुसाट

एकमत ऑनलाईन

अबुधाबी : आयपीएल २०२१ स्पर्धेतील अतितटीच्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्जने कोलकात्याला २ गडी राखून नमवले. कोलकात्याने ७ गडी गमवून विजयासाठी १७२ धावांचे आव्हान दिले होते. हे आव्हान चेन्नईने ८ गडी गमवून पूर्ण केले. या विजयासह चेन्नईचा संघ आयपीएल गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचला. शेवटच्या षटकात आक्रमक खेळी करत रविंद्र जडेजाने संघाला विजय मिळवून दिला. जडेजाने ८ चेंडूत २ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने २२ धावा केल्या. मात्र, ३ चेंडू १ धाव काढताना पहिला चेंडू हुकला. दुस-या चेंडूवर जडेजा बाद झाला. त्यानंतर अखेरच्या चेंडूवर चहरने एक धाव काढत विजयावर शिक्कामोर्तब केले.

कोलकात्याने दिलेले आव्हान पूर्ण करण्यासाठी ऋतुराज गायकवाड आणि फाफ डुप्लेसिस जोडी मैदानात उतरली. या जोडीने संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली. संघाची धावसंख्या ७४ असताना चेन्नईला ऋतुराज गायकवाड बाद झाला. त्याने २८ चेंडूत ४० धावा केल्या. या खेळीत २ चौकार आणि ३ षटकारांचा समावेश आहे. त्यानंतरही फाफने आपला आक्रमक बाणा कायम ठेवला. फाफला मोइन अलीची साथ मिळाली. संघाची धावसंख्या १०२ असताना डुप्लेसिस बाद झाला. त्याने ३० चेंडूत ४३ धावा केल्या. या खेळीत ७ चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर मैदानात आलेला अंबाती रायडू खेळपट्टीवर जास्त वेळ तग धरू शकला नाही. सुनील नरेनने त्याचा त्रिफळा उडवला.

९ चेंडूत १ चौकाराच्या मदतीने त्याने १० धावा केल्या. मोइन अली बाद झाल्याने चेन्नईला चौथा धक्का बसला. मोइनने २८ चेंडूत ३२ धावांची खेळी केली. यात २ चौकार आणि एका षटकाराचा समावेश आहे. त्यानंतर लगेचच सुरेश रैना २ धावा घेण्याच्या नादात बाद झाला. सुरेश रैनाच्या मागोमाग धोनीही त्रिफळाचीत झाला. वरूण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर तो बाद झाला. त्यानंतर रवींद्र जडेजाने आक्रमक खेळी करत विजयापर्यंत आणले. मात्र सॅम करन बाद झाल्याने संघावरील दडपण वाढले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने तीन धावा करत जडेजाला स्ट्राईक दिली. ३ चेंडूत १ धाव हवी असताना त्याचा पहिला चेंडू हुकला. त्यानंतरच्या चेंडूवर जडेजा बाद झाला. त्यामुळे शेवटच्या चेंडूपर्यंत मॅच आली. मात्र, शेवटच्या चेंडूवर दीपक चहरने विजय मिळवून दिला.

तत्पूर्वी कोलकात्याची सुरुवात खराब झाली. सलामीवीर शुबमन गिल पहिल्या षटकाच्या शेवटच्या चेंडूवर धावचीत झाला. अंबाती रायडूने जबरदस्त क्षेत्ररक्षण करत त्याला धावचीत केले. त्याने ५ चेंडूत ९ धावा केल्या. यात २ चौकारांचा समावेश आहे. त्यानंतर वेंकटेश अय्यर आणि राहुल त्रिपाठी यांनी संघाचा डाव सावरला. मात्र संघाची धावसंख्या ५० असताना वेंकटेश अय्यर बाद झाला. त्याने १५ चेंडूत १८ धावा केल्या. यात ३ चौकारांचा समावेश आहे. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर यष्टीरक्षक महेंद्रसिंह धोनीने त्याचा झेल घेतला. कर्णधार इऑन मॉर्गनही खेळपट्टीवर जास्त वेळ तग धरू शकला नाही. १४ चेंडूत ८ धावा करून तो तंबूत परतला. फाफ डुप्लेसिसने त्याचा सीमेवर अप्रतिम झेल पकडला. कर्णधार मॉर्गननंतर राहुल त्रिपाठीही तंबूत परतला. त्याने ३३ चेंडूत ४५ धावा केल्या. रविंद्र जडेजाने त्याचा त्रिफळा उडवला. आंद्रे रसेलच्या रुपाने कोलकात्याला पाचवा धक्का बसला. शार्दुल ठाकूरच्या गोलंदाजीवर त्याचा त्रिफला उडाला. रसेलने १५ चेंडूत २० धावा केल्या. त्यानंतर दिनेश कार्तिक आणि नितीश राणा या जोडीने मोठी धावसंख्या उभारण्यासाठी आक्रमक खेळी केली. दिनेश कार्तिक ११ चेंडूत २६ धावा करून बाद झाला. त्यामुळे कोलकात्याने निर्धारित २० षटकांत ७ बाद १७१ धावांपर्यंत मजल मारली होती.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या