नवी दिल्ली : भारत यंदाचे चेस ऑलिम्पियाड आयोजित करणार आहे. दरम्यान, या जागतिक स्पर्धेवेळी पहिल्यांदाच चेस मशाल प्रज्वलनाची प्रथा सुरू करण्यात येणार आहे.
याबाबतची माहिती भारताचे क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली. याचे उद्घाटन १९ जूनला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे. क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मला सांगण्यास आनंद होत आहे की, ज्या ज्या वेळी चेस ऑलिम्पियाड आयोजित केली जाईल त्या त्यावेळी त्याची मशाल भारतातून प्रज्वलित केली जाईल.
भारत चेस ऑलिम्पियाड आयोजित करण्यासाठी सज्ज झाला आहे. जवळपास १९० देशांमधील ३००० खेळाडू भारतात येणार आहेत. ज्या देशातून बुद्धीबळ खेळाची निर्मिती झाली त्या भारताच्या संस्कृतीचा अनुभव ते घेणार आहे. ज्या प्रमाणे खेलो इंडिया देशभर पसरला त्याचप्रमाणे खेलो चेस देशाच्या कानाकोप-यात पोहचवण्यासाठी आम्ही वेगाने काम करणार आहोत.
चेस ऑलिम्पियाडची मशाल रॅली राजधानी दिल्लीतून सुरू होईल. त्यानंतर ती ७५ शहरामधून जात २७ जुलैला महाबलीपूरम येथे पोहचणार आहे. या ७५ शहरांमध्ये लेह, श्रीनगर, जयपूर, सुरत, मुंबई, भोपाळ, पटना, कोलकाता, गंगटोक, हैदराबाद, बंगळुरू, त्रिशूर, पोर्ट ब्लेअर आणि कन्याकुमारी या शहरांचा समावेश आहे. भारतात होणारे ४४ वे चेस ऑलिम्पियाड २८ जुलैपासून सुरू होणार आहे. ही स्पर्धा १० ऑगस्टपर्यंत चालेल.