पुणे : इंडियन ऑईल कॉर्पोरेशनच्या वतीने आजपासून (दि . ८) सुरू झालेल्या ३२ व्या पेट्रोलियम स्पोर्टस् प्रमोशन बोर्ड इंटर युनिट बुद्धिबळ स्पर्धेत २२ ग्रँडमास्टर्स, ६ महिला ग्रँडमास्टर्स सहभागी झाले आहेत .
कॉर्पोरेशन पश्चिम विभागाचे मुख्य सरव्यवस्थापक अजित धाकरस यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती सांगितली.
स्पर्धेसाठी इंडियन ऑईल कॉर्पोरेशन लिमिटेडच्या संघाला अग्रमानांकन देण्यात आले असून, दुसरे व तिसरे मानांकन हे अनुक्रमे ओएनजीसी व बीपीसीएल यांच्या संघांना देण्यात आले आहे. वैयक्तिक प्रकारात विदित गुजराथी याला पहिले मानांकन मिळाले असून, आर. प्रज्ञानंद याला दुसरे तर एस. पी. सेतुरामन यांना तिसरे मानांकन देण्यात आले आहे.
‘रॅपिड’ सामन्यांचा समावेश असलेली ही स्पर्धा लीग कम नॉकआऊट फॉरमॅटनुसार सांघिक आणि वैयक्तिक अशा दोन विभागात खेळविली जाणार असल्याचे सांगत ग्रँडमास्टर अभिजित कुंटे यांनी सांगितले की, ‘‘स्पर्धेअंतर्गत होणारे सांघिक सामने पीवायसी हिंदू जिमखाना येथे सुरू आहेत.
देशभरातील सार्वजनिक क्षेत्रातील पेट्रोलियम कंपन्यांचे १४ संघ या स्पर्धेत विजेतेपदासाठी एकमेकांसमोर असतील. काही कंपन्यांचे दोन संघ देखील स्पर्धेत सहभागी होणार आहेत. बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर रौनक साधवानी, ग्रँडमास्टर डी. हरिका, महिला ग्रँडमास्टर ईशा करवदे, ग्रँडमास्टर सूर्य शेखर गांगुली, महिला ग्रँडमास्टर सौम्या स्वामिनाथन, ग्रँडमास्टर मुरली कार्तिकेयन, ग्रँडमास्टर एम. आर. ललिथ बाबू (सर्व जण आयओसीएल) ग्रँडमास्टर एस. पी. सेतुरामन, ग्रँडमास्टर दिप्तीयान घोष (दोघेही ओएनजीसी), ग्रँडमास्टर अभिजित गुप्ता, ग्रँडमास्टर जी. एन. गोपाल (दोघेही बीपीसीएल) यांसारखे ग्रँडमास्टर्स सहभागी असणार आहेत.
स्पर्धेत आयओसीएलच्या वतीने ८ ग्रँडमास्टर्स, ओएनजीसीच्या वतीने ९ ग्रँडमास्टर्स तर बीपीसीएलच्या वतीने ५ ग्रँडमास्टर्स सहभागी होतील. ६ महिला ग्रँडमास्टर्सपैकी ५ ग्रँडमास्टर्स या आयओसीएलच्या वतीने तर १ ऑईल इंडिया लिमिटेडच्या वतीने स्पर्धेत सहभागी आहेत.