नवी दिल्ली : माजी भारतीय क्रिकेटपटू नवज्योतसिंग सिद्धूला १९८८ च्या रोड रेज प्रकरणात सुप्रीम कोर्टाने एका वर्षाची सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे. पटियाला सेंट्रल जेलमध्ये सिद्धू शिक्षा भोगतोय. नवज्योतसिंग सिद्धू तुरुंगात क्लार्क म्हणून काम करणार असून त्याची दररोजची कमाई ९० रुपये असणार आहे.
पटियाला सेंट्रल जेलमध्ये त्याला जेलमधील रेकॉर्ड तयार करणे, तसेच कोर्टाच्या ऑर्डरचे विश्लेषण करणे असे काम सोपवण्यात आले आहे. नवज्योतसिंग सिद्धू क्रिकेटबरोबरच त्याच्या राजकीय करिअरसाठी ओळखला जातो, त्याचबरोबर लाफ्टर शो मध्ये त्याची उपस्थिती प्रेक्षकांचे मनोरंजन करणारी असायची. आता तुरुंगात नवज्योतसिंग सिद्धू क्लार्कची भूमिका निभावणार आहे. नवज्योतसिंग सिद्धूला तीन महिन्यांचे ट्रेनिंग दिले जाणार आहे. यात तुरुंगातील रेकॉर्ड बनवण्याची ट्रेनिंग दिली जाणार आहे.
त्याचबरोबर एखाद्या आरोपीविषयी कोर्ट जो आदेश देते, त्या लिखित आदेशाचे विश्लेषण करण्याचे ट्रेनिंगही त्याला देण्यात येणार आहे. तुरुंगातील नियमानुसार पहिले तीन महिने त्याला पगार मिळणार नाही. पण नवज्योतसिंग सिद्धू जरी क्लार्क म्हणून काम करणार असला तरी त्याला त्याच्या कोठडीतूनच हे काम करावे लागणार आहे. तुरुंग अधिका-यांनी दिलेल्या माहितीनुसार सिद्धूने मंगळवारपासून काम सुरू केल्े आहे. त्याला दोन शिफ्टमध्ये काम करावे लागणार आहे. नवज्योतसिंग सिद्धूला सुप्रीम कोर्टाने एक वर्ष सक्त कारावासाची शिक्षा सुनावली आहे.