नवी दिल्ली : आयपीएलच्या पंधराव्या हंगामात निराशाजनक कामगिरी करणा-या चेन्नईच्या संघासाठी आनंदाची बातमी आहे. चेन्नईचा स्टार गोलंदाज दीपक चहरने दुखापतीवर मात केली असून तो पुन्हा मैदानात पुनरागमन करण्यासाठी सज्ज झाला आहे. भारताचा दिग्गज फिरकीपटू अमित मिश्राने ट्विटरद्वारे दीपक चहरच्या तंदुरुस्तीबाबत माहिती दिली आहे .
दुखापतीमुळे दीपक चहर गेल्या काही महिन्यांपासून क्रिकेट खेळला नाही. ऑस्ट्रेलियात होणा-या आगामी टी-२० विश्वचषकापूर्वी दीपक चहरचे तंदुरुस्त होणे भारतीय संघासाठी चांगली गोष्ट ठरू शकते.
दरम्यान, फेब्रुवारी महिन्यापासून दीपक चहर क्रिकेटपासून दूर आहे. दीपक चहरला वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या टी-२० मालिकेदरम्यान हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली होती. ज्यामुळे त्याला आयपीएल २०२२ मधून बाहेर पडावे लागले होते. आयपीएल २०२२ च्या लिलावात चेन्नई सुपर किंग्जने दीपक चहरला १४ कोटी रुपयांना विकत घेतले होते. परंतु, दुखापतीमुळे त्याला चेन्नईच्या संघासाठी एकही सामना खेळता आला नव्हता. ज्याचा परिणाम चेन्नईच्या संघाने भोगला आहे.