27.8 C
Latur
Friday, July 1, 2022
Homeक्रीडादिल्लीच्या आशा कायम

दिल्लीच्या आशा कायम

एकमत ऑनलाईन

आयपीएल २०२२चा ६४वा साखळी फेरी सामना दिल्ली विरुद्ध पंजाब यांच्यात मुंबईच्या डी. वाय. पाटील स्टेडियमवर झाला. या सामन्यात दिल्ली संघाला फलंदाजीत विशेष कामगिरी करता आली नाही.

पंजाबने नाणेफेक जिंकून दिल्लीला फलंदाजीसाठी बोलावले. एकटा मिचेल मार्श वगळता इतर कोणालाही मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यातच दिल्लीचा सलामीवीर डेव्हिड वॉर्नरची पहिल्याच चेंडूवर पंजाबच्या लियाम लिविंगस्टोनने विकेट काढली. दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नर आणि सरफराज खानची जोडी फलंदाजीसाठी आली. लिविंगस्टोनच्या षटकातील पहिलाच चेंडू हवेत टोलवण्याच्या प्रयत्नात वॉर्नर राहुल चहरच्या हातून झेलबाद झाला. आयपीएल सामन्यातील पहिल्या चेंडूवर विकेट काढणारा लिविंगस्टोन चौथा फिरकीपटू ठरला आहे.

लिविंगस्टोनपूर्वी केविन पीटरसन, मार्लन सॅम्युअल्स आणि जगदीश सुचिथ यांनी हा पराक्रम केला आहे. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीकडून मिचेल मार्शने ४८ चेंडंूत ३ षटकार आणि ४ चौकारांच्या मदतीने सर्वाधिक ६३ धावा चोपल्या. त्याच्याव्यतिरिक्त दिल्लीकडून इतर फलंदाजांना मोठी खेळी करता आली नाही. सलामीला आलेल्या सरफराज खान(३२), ललित यादव २४ धावा करून बाद झाला. कर्णधार रिषभ पंत केवळ ७ धावांचे योगदान देऊ शकला. या डावात पंजाबच्या गोलंदाजांनीही अप्रतिम प्रदर्शन केले.

पंजाबकडून लियाम लिविंगस्टोनने ४ षटकांत २७ धावांत दिल्लीच्या ३ फलंदाजांना बाद केले. तर अर्शदीपने ३७ धावा देत ३ विकेट्स काढल्या. तसेच हरप्रीत ब्रारनेही एका फलंदाजाला तंबूत धाडले. हा सामना उभय संघांसाठी प्ले ऑफमध्ये पात्रता मिळवण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने दोन्हीही संघांनी जिंकण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना दिल्लीने २० षटकांत ७ बाद १५९ धावा केल्या. प्रत्युत्तरात पंजाबचा संघ २० षटकांत ९ बाद १४२ धावा करू शकला. दिल्लीने १७ धावांनी या सामन्यात बाजी मारली.

हा त्यांचा हंगामातील सातवा विजय. भेदक गोलंदाजीमुळे दिल्लीच्या प्ले ऑफला पोहोचण्याच्या आशा आणखी वाढल्या आहेत, तर दुसरीकडे पंजाबसोबतच आरसीबीच्या प्ले ऑफच्या मार्गातही मोठा अडथळा निर्माण झाल. दिल्ली पॉईंट्स टेबलमध्ये चौथ्या क्रमांकावर पोहोचली आहे. दिल्लीने १३ पैकी ७ सामने जिंकले आहेत तर आरसीबीनेही दिल्लीएवढेच सामने जिंकले आहेत. पण दिल्लीचा नेट रनरेट प्लसमध्ये आणि आरसीबीचा मायनसमध्ये आहे.

दिल्लीच्या १६० धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना पंजाबचा डाव पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे कोसळला. पंजाबकडून यष्टीरक्षक जितेश शर्माने चिवट झुंज दिली. परंतु इतर फलंदाजांची साथ न मिळाल्याने तो संघाचा पराभव टाळू शकला नाही. ३४ चेंडंूत २ षटकार आणि ३ चौकारांसह ४४ धावा करून तो बाद झाला. तसेच जॉनी बेयरस्टो (२८), शिखर धवन (१९) आणि राहुल चहर (नाबाद २५) यांनीही थोडाफार प्रयत्न केला. पंजाबचे ६ फलंदाज एकेरी धावसंख्येवर बाद झाले. दिल्लीकडून शार्दुल ठाकूरने ४ षटकांत ३६ धावा देत ४ विकेट्स घेतल्या. शार्दुल ठाकूरला सामनावीर घोषित करण्यात आले तसेच अक्षर पटेल आणि कुलदीप यादव यांनीही प्रत्येकी २ फलंदाजांना बाद केले. एन्रिच नॉर्कियानेही एका विकेटचे योगदान दिले.

Stay Connected

1,567FansLike
187FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या