‘मैं पल दो पल का शायर हूं’ असे म्हणत अखेर भारतीय क्रिकेट संघाचा सर्वाधिक यशस्वी कर्णधार ठरलेल्या महेंदसिंग धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आणि त्याची १६ वर्षांची क्रिकेटमधील कारकीर्द संपुष्टात आली. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असली तरी तो आयपीएलमध्ये खेळत राहणार आहे ही त्याच्या चाहत्यांच्या दृष्टीने जमेची बाजू आहे.
खरं तर २०१९ मधील इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेतील धोनीच्या सुमार कामगिरीमुळे निवड समितीने धोनीला नंतर संघातून वगळले होते. वाढत्या वयामुळे त्याच्या शारीरिक हालचाली मंदावल्या होत्या. त्याचा परिणाम त्याच्या खेळावर दिसून येत होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. ते काहीही असो. पण आपल्या क्रिकेटवेड्या देशातील क्रिकेटरसिकांना त्याने अनेक आनंदाचे क्षण मिळवून दिले.
किम जोंग उन : भाकरी मिळत नसेल तर कुत्र्यांना मारा!
कारण त्याच्या नेतृत्वखाली भारताने २००७ साली ट्वेन्टी-२० विश्वचषक जिंकला. त्यानंतर २०११ साली भारताने एकदिवसीय विश्वचषक जिंकला. तर त्याच्याच नेतृत्वाखाली २०१३ साली भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स करंडकावर आपले नाव कोरले. विशेष म्हणजे त्याच्याच कर्णधारपदाच्या काळात भारतीय संघ कसोटी क्रमवारीत अव्वल स्थानावर पोहोचला होता. त्याची क्रिकेट कारकीर्द म्हणजे भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळ म्हणावा लागेल.
संघ अडचणीत सापडलेला असताना जराही विचलित न होणारा व संयमाने परिस्थिती हाताळणारा धोनी मैदानावर कायम शांत दिसायचा. त्यादृष्टीने त्याला ‘अखंड स्थितीचा निर्धारु, स्थिरचित्त धोनी’ असे म्हणावे लागेल. झारखंडसारख्या छोट्या राज्यातून येऊन महेंद्रसिंग धोनी क्रिकेट विश्वात एक दंतकथा बनून राहिला आहे. त्याच्या भावी वाटचालीस शुभेच्छा!
-प्रदीप शंकर मोरे