25.5 C
Latur
Monday, September 27, 2021
Homeक्रीडाधवन सेनेची ट्वेंटी-२० तही विजयी सलामी

धवन सेनेची ट्वेंटी-२० तही विजयी सलामी

एकमत ऑनलाईन

कोलंबो : एकदिवसीय मालिका जिंकल्यानंतर श्रीलंकेविरुद्ध पहिलाच ट्वेन्टी-२० सामना जिंकत भारतीय संघाने विजयी सलामी दिली. भारताने प्रथम फलंदाजी करताना श्रीलंकेपुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. त्यानंतर श्रीलंकेचा संघ या आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरला खरा. मात्र, भारताच्या गोलंदाजांनी श्रीलंकेच्या फलंदाजांवर चांगलाच अंकुश ठेवला. त्यामुळे श्रीलंकेने १८.३ षटकांत सर्व गडी बाद झाल्याने १२६ धावांपर्यंतच मजल मारता आली. त्यामुळे भारतीय संघाला पहिल्याच सामन्यात ३८ धावांनी विजय साकारता आला.

नाणेफेक गमावलेल्या भारताने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ५ बाद १६४ धावा केल्या. मुंबईकर फलंदाज सूर्यकुमार यादवने आपला दमदार फॉर्म कायम राखत अर्धशतक ठोकले. प्रत्युत्तरात श्रीलंका २० षटकात १२६ धावांवर ढेपाळली. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ४ बळी घेतले. त्यालाच सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. या विजयासह भारताने ३ सामन्यांच्या टी-२० मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

भारताच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना श्रीलंकेची सुरुवात खराब झाली. त्यांनी ५० धावांत अविष्का फर्नांडो, मिनोद भानुका आणि धनंजय डि सिल्वाला गमावले. अविष्का चांगल्या लयीत खेळत होता. पण भुवनेश्वरने त्याचा काटा काढला. अविष्काने ३ चौकारांसह ६ धावा केल्या. मधल्या फळीत चरिथ असालांकाने थोडा प्रतिकार केला. पण दुस-या बाजूने त्याला योग्य साथ मिळाली नाही. असालांकाने २६ चेंडूत ३ चौकार आणि ३ षटकारांसह ४४ धावा केल्या. असालांका बाद झाल्यावर भारतीय गोलंदाजांनी तिखट मारा केला. या मा-यापुढे लंकेचे शेपटाकडील फलंदाज निष्प्रभ ठरले. श्रीलंकेला १८.३ षटकात सर्वबाद १२६ धावाच करता आल्या. भारताकडून भुवनेश्वर कुमारने ३३ धावांत सर्वाधिक ४ बळी घेतले. दीपक चहरला २ बळी घेता आले.

तत्पूर्वी पदार्पणाची संधी मिळालेला पृथ्वी शॉ आणि कर्णधार शिखर धवन यांनी डावाची सुरुवात केली. मात्र पहिलाच चेंडू घातक ठरला. लंकेचा वेगवान गोलंदाज दुश्मंता चमीराने पृथ्वीला यष्टीपाठी झेलबाद केले. पृथ्वी बाद झाल्यावर संजू सॅमसन मैदानात आला. त्याने धवनसोबत अर्धशतकी भागीदारी रचली. टीम इंडियाचे अर्धशतक झाल्यानंतर वनिदू हसरंगाने सॅमसनला पायचित पकडले. सॅमसनने २७ धावांची खेळी केली. सॅमसनची जागा सूर्यकुमार यादवने घेतली. धवन-सूर्यकुमारने टीम इंडियाचे शतक फलकावर लावले. या दोघांनी ३६ चेंडूत अर्धशतकी भागीदारी पूर्ण केली. १४ व्या षटकात भारताचा कर्णधार झेलबाद झाला.

धवनने ४ चौकार आणि एका षटकारासह ४६ धावांची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यानंतर सूर्यकुमारने अफलातून अर्धशतक ठोकले. १६ व्या षटकात सूर्यकुमार हसरंगाच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याने ५ चौकार आणि २ षटकारांसह ५० धावांची खेळी केली. सूर्यकुमारनंतर आलेला हार्दिक पंड्या पुन्हा एकदा अपयशी ठरला. पंड्याने १२ चेंडूत १० धावा केल्या. शेवटच्या षटकांत इशान किशनने फटकेबाजी केल्यामुळे भारताला दीडशेचा पल्ला गाठता आला. इशानने २० धावा केल्या. लंकेकडून हसरंगा आणि चमीरा यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

१९ सप्टेंबरला रंगणार मुंबई-चेन्नईमध्ये लढत

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
194FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या