‘बीसीसीआय’चे माजी खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांचे मत
नवी दिल्ली : भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीमध्ये अद्याप बरेच क्रिकेट शिल्लक असून त्याला भारतीय क्रिकेटसाठी अधिक योगदान द्यायचे आहे, अशी प्रतिक्रिया भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे माजी खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांनी व्यक्त केली.
जुलै महिन्यात धोनी चाळिशीत पदार्पण करणार असून गतवर्षी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या उपान्त्य सामन्यात भारताने पराभव पत्करल्यापासून तो एकही आंतरराष्ट्रीय सामना खेळलेला नाही. तसेच सध्या कोरोनामुळे क्रिकेटचे भवितव्य अधांतरी असल्याने धोनीच्या निवृत्तीविषयक चर्चांनाही उधाण आले आहे; परंतु चौधरी यांना मात्र धोनीने इतक्या लगेच निवृत्त होऊ नये, असे वाटते.
Read More चीनची तैवानला युद्धाची धमकी
‘‘धोनी हा शारीरिकदृष्ट्या अजूनही पूर्णपणे तंदुरुस्त आहे. त्याच्यासारखा यष्टिरक्षक भारताला अद्यापही गवसलेला नाही. मुख्य म्हणजे धोनीची कामगिरी इतकीही सुमार झालेली नाही की त्याने निवृत्ती पत्करावी. त्यामुळे किमान ट्वेन्टी-२० विश्वचषक स्पर्धा तो नक्कीच खेळू शकतो. त्याच्यात बरेच क्रिकेट शिल्लक असून इंडियन प्रीमियर लीग खेळवण्यात आल्यास त्यामध्ये तो हमखास छाप पाडेल,’’ असे चौधरी म्हणाले.
‘‘त्याचप्रमाणे ‘आयपीएल’चे आयोजन करताना ‘बीसीसीआय’ने देशातील स्थानिक तसेच विदेशातील क्रिकेटपटूंचाही विचार करावा. फक्त भारतीय संघातील खेळाडूंचा विचार करून ‘आयपीएल’ खेळवल्यास चाहत्यांचा हिरमोड होऊ शकतो. तसेच यामुळे आर्थिक नुकसानाची भरपाईसुद्धा फारशी करता येणार नाही,’’ याकडेही चौधरी यांनी ‘बीसीसीआय’चे लक्ष वेधले आहे.