मुंबई : ‘आता ब-याच गोष्टी बदलल्यात. रोहित, विराटच्या बॅटमधून पहिल्यासारख्या धावा येत नाहीत. अनेक युवा खेळाडू संधीच्या प्रतीक्षेत आहेत. कोहली आणि रोहितच्या बळावर वर्ल्डकप विजयाच्या अपेक्षा ठेवल्या नाहीत तर चांगले होईल.’ असे विधान कपिल देव यांनी रोहित शर्मा आणि विराट कोहलीचा फॉर्म लक्षात घेऊन केले आहे, असे कपिल देव यांनी म्हटले आहे.
दरम्यान भारतीय क्रिकेटमध्ये सध्या संक्रमणाचा काळ सुरू आहे. रोहित शर्मा आणि विराट कोहली आता टी-२० मालिकांमध्ये फारसे दिसणार नाहीत. यावर्षी भारतात वनडे वर्ल्डकप होणार आहे. त्यानंतर वनडेमध्येही रोहित-विराट फारसे दिसणार नाहीत. याचे कारण आहे, त्यांचे वाढते वय. मागच्या १० वर्षांपासून रोहित आणि विराट भारतीय क्रिकेटचे आधारस्तंभ होते. मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये टॉप १० फलंदाजांमध्ये अजूनही त्यांचा समावेश होतो.
पुढे बोलताना कपिल देव म्हणाले, तुम्हाला वर्ल्डकप जिंकायचा असेल तर कोच, सिलेक्टर्स आणि टीम मॅनेजमेंटला काही कठोर निर्णय घ्यावे लागतील.
व्यक्तिगत हित बाजूला ठेवावे लागेल. टीमचा विचार करावा लागेल. विराट, रोहित किंवा अन्य दोन-तीन खेळाडूंवर तुम्ही वर्ल्डकप विजयासाठी विसंबून रहाल तर असे कधी होणार नाही. तुम्ही तुमच्या टीमवर विश्वास ठेवला पाहिजे. आपल्याकडे अशी टीम आहे का? हो, अशी टीम आहे. काही मॅच विनर्स आहेत का? हो, आहेत, आपल्याकडे असे प्लेअर्स आहेत, जे वर्ल्डकप जिंकून देऊ शकतात, असे कपिल देव एका वृत्तवाहिनीवर म्हणाले.