नवी दिल्ली : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आजपासून पाच सामन्यांच्या टी-२० आंतरराष्ट्रीय मालिकेची सुरुवात होणार आहे. पहिला सामना दिल्ली येथे खेळवण्यात येणार आहे. दरम्यान, मोठी माहिती समोर आली आहे. सामन्यापूर्वी बीसीसीआयने नियमांमध्ये काही बदल केले आहेत.
याच पार्श्वभूमीवर बीसीसीआयने दिल्लीच्या उन्हापासून खेळाडूंना वाचवण्यासाठी सामन्यादरम्यान १० षटकांनंतर ड्रिंक ब्रेक घेण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय दोन्ही संघातील खेळाडूंना दिलासा देणारा आहे. अशा परिस्थितीत बोर्डाच्या या निर्णयाचे दोन्ही संघांनी स्वागत केले.
खरंतर टी-२० सामन्यादरम्यान कोणताही ब्रेक घेतला जात नाही. मात्र, दिल्लीतील तापमानाची परिस्थिती पाहता बीसीसीआयने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमा दिल्लीच्या उकाड्याने चांगलाच अस्वस्थ आहे. कर्णधार टेम्बा बावुमाने यासंदर्भात खंत व्यक्त केली आहे.
‘‘आम्हाला इथे उकाडा असेल अशी अपेक्षा होती, पण इतकी गरमी असेल हे माहीत नव्हते. हे सामने रात्री खेळवले जात आहेत हे चांगले आहे, कारण ही उष्णता रात्रीही सहन करता येते. दिवसा लोक स्वत:ची काळजी घेत आहेत. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्या आणि मानसिकदृष्ट्या जास्तीत जास्त ताजेतवाने राहा, असे आवाहन टेम्बा बावुमाने केले आहे.