रावळपिंडी : पाकिस्तानविरोधात सुरु असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्याच दिवशी इंग्लंडच्या संघाने विश्वविक्रमाला गवसणी घातली आहे. इंग्लंड संघाने एका दिवसात ५०६ धावांचा डोंगर उभारला आहे. इंग्लंड संघाने ११२ वर्षापूर्वीचा विक्रम मोडीत काढला. पहिल्या दिवशी इंग्लंडच्या ४ फलंदाजांनी शतक झळकावली आहेत. रावळपिंडी येथे सुरू असलेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी इंग्लंड संघाने चार गड्यांंच्या मोबदल्यात ५०६ धावांचा डोंगर उभारला.
कसोटी क्रिकेटमध्ये या अगोदरही एका दिवसात ५०० धावांसख्येच्या जवळ पोहचल्याची उदाहरणे आहेत. यात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड या संघाचाही समावेश आहे. ऑस्ट्रेलियाने १९१० मध्ये सिडनी येथे दक्षिण आफ्रिका विरोधात कसोटीच्या पहिल्या दिवशी ४९६ धावांचा पाऊस पाडला. २०१२ मध्ये एडिलेडमध्ये झालेल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दिवशी ४८२ धावांचा पाऊस पाडला. १९३४ मध्ये इंग्लंड-ऑस्ट्रेलियात ओव्हल मैदानावर झालेल्या कसोटी सामन्यातही इंग्लंडने एका दिवसात ४७५ धावा केल्या होत्या. १९३६ मध्ये इंग्लंडने भारताविरुद्ध एका दिवसात ४७१ धावा केल्या होत्या.