नवी दिल्ली : भारतीय संघ सध्या इंग्लंड दौ-यावर आहे. या दौ-यात भारत आणि इंग्लंड यांच्यात बर्मिंगहॅम येथे रिशेड्युल कसोटी सामना खेळला जात आहे. या सामन्यातील चौथ्या दिवशी स्टँडमध्ये बसलेल्या इंग्लंडच्या प्रेक्षकांनी भारतीयांशी गैरवर्तन केले.
एका युजरने ही घटना सोशल मीडियावर शेअर केल्यानंतर ही बाब समोर आली. एरिक हॉलीज स्टँडमध्ये बसलेल्या भारतीय चाहत्यांवर थेट वर्णद्वेषी टिप्पण्या केल्याचे त्याने म्हटले आहे. या प्रकरणी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने दिलगिरी व्यक्त करत पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू केली आहे.
एजबॅस्टनचे मुख्य कार्यकारी काय म्हणाले?
आम्ही एजबॅस्टनमध्ये सर्वांसाठी सुरक्षित आणि स्वागतार्ह वातावरण निर्माण करत आहोत, अशा प्रतिक्रिया ऐकून आम्हाला धक्का बसला आहे. ट्विटनंतर मी त्या व्यक्तीशी वैयक्तिकरीत्या बोललो आणि या प्रकरणाची चौकशी सुरू केली. एजबॅस्टनमध्ये कोणालाही अशी वागणूक देऊ नये. या प्रकरणाची त्वरित चौकशी केली जाईल, असा इशाराही त्यांनी इंग्लंडच्या चाहत्यांना दिला.