23.8 C
Latur
Friday, September 24, 2021
Homeक्रीडापाचवा कसोटी सामना रद्द

पाचवा कसोटी सामना रद्द

एकमत ऑनलाईन

मँचेस्टर : भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाने (ईसीबी) भारत आणि इंग्लंडदरम्यान मँचेस्टर येथे होणारा पाचवा कसोटी सामना रद्द केला आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने ट्विटरवरून यासंदर्भात माहिती दिली. भारतीय संघातील भारतीय क्रिकेट संघाचे सहाय्यक फिजिओ योगेश परमार यांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्यामुळे खेळाडूंनाही कोरोना संसर्गाचा धोका असल्याने कसोटी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीसीसीआय आणि ईसीबीच्या अधिका-यांनी पाचव्या कसोटीसंदर्भात गुरुवारी आणि शुक्रवारी सविस्तर चर्चा करून सर्व शक्यता पडताळून पाहिल्या.

दोन्हीकडील अधिका-यांमध्ये सामन्याच्या आयोजनासंदर्भात चर्चा झाली. त्यानंतर सामन्याला अगदी काही तास शिल्लक असताना केलेल्या चर्चेनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, या भीतीने सामना रद्द करण्यात आला. यासाठी दोन्ही क्रिकेट मंडळांकडून क्रिकेट चाहते आणि सामन्याशी संबंधित इतर सहका-यांंची माफीही मागण्यात आली. भारतीय संघामधील सदस्य कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढण्याची भीती असल्याने सामना रद्द करण्याचा निर्णय घेतला जात आहे, असे ईसीबीने स्पष्ट केले आहे. भारतीय संघ मैदानामध्ये उतरू शकत नाही, असा उल्लेखही ईसीबीच्या अधिकृत पत्रकामध्ये आहे.

तसेच सामना रद्द झाला असला तरी मालिका बरोबरीमध्ये सुटणार की भारताकडे चषक दिला जाणार, याची घोषणा अद्याप करण्यात आलेली नाही.
गुरुवारी भारतीय संघातील खेळाडूंची एक बैठक झाली. या बैठकीमध्ये संघातील अनेक खेळाडूंनी पाचवा कसोटी सामना न खेळण्याच्या बाजूने मत नोंदवले होते. संयुक्त अरब अमिराती म्हणजेच युएईमध्ये १९ सप्टेंबरपासून इंडियन प्रिमियर लिगचे उर्वरित पर्व खेळवले जाणार आहे. याच पार्श्वभूमीवर खेळाडू संसर्गाच्या भीतीने खेळण्याबद्दल फारसे उत्साही नसल्याचे म्हटले आहे. कोरोना पॉझिटिव्ह आलेले फिजिओ परमार हे रोहित शर्मा, चेतेश्वर पुजारा, मोहम्मद शामी, इशांत शर्मा यासारख्या खेळाडूंसोबत काम करत होते.

खेळाडूंच्या मनातही कोरोनाची भीती
कोरोना संसर्ग झाल्यानंतर त्याची लक्षणे दिसण्यासाठी काही दिवसांचा कालावधी लागतो ही चिंता खेळाडूंच्या मनात असल्याचे चर्चेदरम्यान दिसून आले. भविष्यात एखाद्या खेळाडूच्या माध्यमातून संसर्ग झाल्यास आयपीएलमधील सहभाग आणि त्यानंतर ऑक्टोबरमध्ये होणा-या टी २० विश्वचषकामध्ये खेळण्यासंदर्भात अडचणी निर्माण होतील, असे खेळाडूंना वाटत आहे.

ईसीबीची अजब मागणी
एकीकडे भारताला खेळण्याची इच्छा नसल्याचे सांगितले जात असतानाच दुसरीकडे भारताने पाचव्या कसोटीत इंग्लंडला विजय बहाल करावा, अशी इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट मंडळाची (ईसीबी) मागणी केल्याचे समजते. मात्र, ही मागणी कर्णधार विराट कोहली आणि रोहित शर्माने फेटाळून लावली. शास्त्री, अरुण आणि परमार यांना कोरोनाची लागण झाल्याने भारताचे सर्व खेळाडू सध्या विलगीकरणात आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या