22.2 C
Latur
Friday, September 30, 2022
Homeक्रीडापाच वेळा विजेत्या मुंबईचे पराभवाचे ‘सप्तक’ ; चेन्नईने जिंकला रोमांचक सामना

पाच वेळा विजेत्या मुंबईचे पराभवाचे ‘सप्तक’ ; चेन्नईने जिंकला रोमांचक सामना

एकमत ऑनलाईन

इंडियन प्रीमियर लीग २०२२ मधील ३३ वा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात डॉ. डी. वाय. पाटील स्टेडियममध्ये झाला. क्षणाक्षणाला विजयाचे पारडे वर-खाली करणा-या या सामन्यात चेन्नईने अखेरच्या चेंडूवर चौकार ठोकत ३ विकेट्सनी विजय मिळवला आणि मुंबईने आयपीएलच्या इतिहासातील सर्वांत लाजिरवाण्या पराभवाच्या ‘सप्तका’चा विक्रम नोंदवला. चेन्नईच्या या विजयात माजी कर्णधार एम. एस. धोनी याचा मोठा वाटा होता. त्याने अखेरच्या षटकात १६ धावा काढत चेन्नईला विजय मिळवून दिला आणि धोनीने आपण अजूनही फिनिशर आहोत हे दाखवून दिले. यानंतर चेन्नईच्या गोटात आनंदाचे वातावरण होते, तर नवा कर्णधार रवींद्र जडेजा शेवटी थेट धोनीसमोर नतमस्तक झाला. सामन्यादरम्यान दोन्ही संघांत चांगलीच टशन पाहायला मिळाली. मुंबईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ७ बाद १५५ धावा केल्या. सीएसकेसाठी मुकेश चौधरीने टाकलेल्या पहिल्या षटकात रोहित शर्मा (०) आणि ईशान किशन (०) यांच्या रूपात दोन मोठे मासे गळाला लागले. मुंबई इंडियन्सच्या या दोन्ही सलामीवीरांना स्वत:चे खाते देखील खोलता आले नाही. असे असले, तरी मध्यक्रमात तिलक वर्माने ४३ चेंडूंत ३ चौकार आणि २ षटकारांच्या मदतीने नाबाद ५१ धावांची महत्त्वाची अर्धशतकी खेळी केली आणि मुंबईला सन्मानजनक धावसंख्येपर्यंत पोहोचवले. तसेच, खालच्या फळीत जयदेव उनाडकटने ९ चेंडूंत १ चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने नाबाद १९ महत्त्वाच्या धावा केल्या. सूर्यकुमारने ३२ धावा केल्या. तसेच चेन्नईकडून मुकेश चौधरीने १९ धावांत ३ विकेट्स घेतल्या. मुंबईने चेन्नईसमोर ठेवलेल्या १५६ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना चेन्नईनेही नियमित अंतराने विकेट्स गमावल्या त्यामुळे सामना अखेरच्या षटकापर्यंत गेला. चेन्नईच्या ऋतुराज गायकवाडला डॅनियल सम्सने पहिल्याच चेंडूवर झेलबाद केले. मिचेल सेंटनरही जास्त प्रभाव दाखवू शकला नाही. त्यानंतर मैदानात उतरलेल्या चेन्नईकडून अंबाती रायुडूने ४० धावांची आणि रॉबिन उथप्पाने ३० धावांची खेळी केली. अखेरीस ड्वेन प्रीटोरियसने २२ आणि धोनीने १३ चेंडंूत नाबाद २८ धावा करत चेन्नईला विजयापर्यंत पोहोचवले. अखेरच्या षटकात चेन्नईला विजयासाठी १७ धावांची गरज होती. यावेळी चेन्नईकडून एम. एस. धोनीसह ड्वेन प्रीटोरियस फलंदाजी करत होता, तर मुंबईकडून जयदेव उनाडकट गोलंदाजी करत होता. त्याने या षटकाच्या पहिल्या चेंडूवर प्रीटोरियसला बाद करत माघारी धाडले. त्यामुळे ड्वेन ब्राव्हो मैदानात आला. त्याने एक धाव काढत धोनीला स्ट्राईक दिली. पुढे धोनीने तिस-या चेंडूवर षटकार आणि चौथ्या चेंडूवर चौकार मारत १० धावा वसूल केल्या. त्यानंतर ब्राव्हो आणि त्याने दुहेरी धावा घेतल्या. अखेरच्या चेंडूवर ४ धावांची गरज असताना धोनीने चौकार ठोकत चेन्नईच्या विजयावर शिक्कामोर्तब केले.
आयपीएलमधील सर्वांत यशस्वी संघ म्हणजे, मुंबई संघ. त्यांनी आतापर्यंत ५ वेळा आयपीएलचा किताब पटकावला आहे. हे पाचही किताब मुंबईने रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली २०१३, २०१५, २०१७, २०१९ आणि २०२० या हंगामात पटकावले आहेत. मात्र, यंदाच्या हंगामात मुंबई संघाला खास कामगिरी करता आलेली नाही. आयपीएलमध्ये आतापर्यंत सुरुवातीचे सलग ७ सामने गमावण्याचा नकोसा व लाजिरवाणा विक्रम करणारा मुंबई पहिलाच संघ ठरला आहे. या विजयासह चेन्नईने ४ गुण मिळवले आहेत. गुणतालिकेत ते नवव्या क्रमांकावर आहेत. दुसरीकडे, मुंबई या पराभवासह पुन्हा एकदा तळाशीच शेवटून पहिल्या दहाव्या क्रमांकावर कायम राहिला.
– डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या