नवी दिल्ली : इंग्लंडने भारताला पाचव्या कसोटीत सात विकेट्सनी मात देत गतवर्षीची मालिका बरोबरीत सोडवली. भारताने इंग्लंडला चौथ्या डावात विजयासाठी ३७८ धावांचे आव्हान दिले होते. हे मोठे आव्हान इंग्लंडने तीन विकेट्सच्या मोबदल्यात पाचव्या दिवशीच्या पहिल्या सत्रातच पार करून इतिहास रचला.
यानंतर इंग्लंडचा माजी कर्णधार मायकल वॉनने वसिम जाफरला ट्रोल करण्याचा प्रयत्न केला. परंतु वसिम जाफरने ‘तू’ लिहायचेच विसरले, जरा स्कोअरलाईन तपासा ती २-२ आहे. असे उत्तर देत वॉनला फटकारले.
दरम्यान इंग्लंडने पाचवी कसोटी जिंकल्यानंतर मायकल वॉनने वसिम जाफरला टॅग करत ‘मी फक्त ठीक आहेस का हे तपासतोय.’ असे ट्विट केले. वॉनने असे ट्विट करून जाफरला डिवचण्याचा प्रयत्न केला. मात्र वसिम जाफरने वॉनचा हा प्रयत्न हाणून पाडला. त्याने वॉनच्या या खोडसाळ ट्विटला प्रत्युत्तर दिले.
याचबरोबर ट्विटमधील एक चूक देखील दाखवून दिली. जाफर म्हणाला की, ‘जोश दाखवत ट्विट करताना ‘तू’ लिहायचेच विसरले, जरा स्कोअरलाईन तपासा ती २-२ आहे.’
दुसरीकडे वॉनने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर कोहलीला देखील ट्रोल करणारी पोस्ट शेअर केली. त्याने भारताचा माजी कर्णधार विराट आणि इंग्लंडचा माजी कर्णधार जो रूट यांची २०१९ पासून तुलना केली. या दोघांनी कसोटीत २०१९ पासून किती शतके केली याची आकडेवारी दिली.
वॉनने विराटबद्दल पोस्ट केली की, उल्लेखनीय, नोव्हेंबर २०१९ ला विराट कोहलीने कसोटीत २७ शतके ठोकली होती. त्यावेळी जो रूटची कसोटी शतकांची संख्या १७ होती. जुलै २०२२ मध्ये विराट कोहलीची कसोटी शतकांची संख्या २७ वरच राहिली तर जो रूटने त्याला मागे टाकत २८ कसोटी शतके ठोकली.