नवी दिल्ली: तिस-या कसोटीपूर्वी टीम इंडियासाठी गुड न्यूज आहे. उपकर्णधार रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुभमन गिल व नवदीप सैनी यांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे. त्यामुळे ७ जानेवारीपासून सिडनीत सुरू होणा-या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिस-या कसोटीत खेळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने या प्रकरणी माहिती दिली आहे. टीम इंडियाकडून खेळणा-या खेळाडूंची आणि सपोर्ट स्टाफटची ३ जानेवारीला आरटी-पीसीआर चाचणी करण्यात आली. सर्वांच्या चाचणीचा अहवाल निगेटीव्ह आला आहे. यामुळे चाहत्यांनाही दिलासा मिळाला असून खेळाडूंनीही मोकळा श्वास घेतला आहे.
काय आहे प्रकरण?
रोहित शर्मा, पृथ्वी शॉ, रिषभ पंत, शुभमन गिल व नवदीप सैनी यांनी शुक्रवारी मेलबर्नमधील एका हॉटेलमध्ये जेवण केले. मात्र एका चाहत्याने आग्रहाने या क्रिकेटपटूंच्या पार्टीचे बिल दिले व त्यांच्या सोबत सेल्फी काढून तो सोशल मीडियावर पोस्ट केला. चाहत्याने हा सेल्फी सोशल मीडियावर टाकल्यानंतर ऑस्ट्रेलियन मीडियाला आयते कोलित मिळाले. भारतीय क्रिकेटपटूंनी बायो-बबलचा नियम मोडल्याचा कांगावा त्यांनी केला. त्यामुळे क्रिकेट ऑस्ट्रेलियाने खबरदारीचा उपाय म्हणून रोहितसह या पाचही खेळाडूंना विलगीकरणात ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र आता या पाचही जणांची कोरोना चाचणी निगेटीव्ह आली आहे.
चाहत्याने मागितली माफी
सोशल मीडियावर आपण पोस्ट टाकल्यामुळेच भारतीय क्रिकेटपटूंना मानसिक त्रास झाल्याने नवलदीप सिंग या चाहत्याने पुन्हा एक ट्विट करून माफी मागितली. रिषभ पंतने मला मिठी मारली नव्हती. केवळ उत्साहाच्या भरात मी तसे लिहिले होते. ंिहदुस्थानी क्रिकेटपटूंनी नियमांचे पालन करूनच हॉटेलमध्ये जेवण केले, असे स्पष्टीकरणही नवलदीपने दिले.