नवी दिल्ली : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरचा ‘टाइम्स लिस्ट ऑफ १००’ च्या यादीत समावेश करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या यादीतील हरमनप्रीत कौर ही एकमेव भारतीय क्रिकेटर आहे. हरमनप्रीत कौर ही विराट कोहली, रोहित शर्मा, हार्दिक पांड्या आणि के. एल. राहुलवर देखील भारी पडली.
‘टाइम्स’च्या १०० प्रेरणादायी लीडरमध्ये कौरचा समावेश हा इनोव्हेटर्स या श्रेणीत करण्यात आला आहे. कौरसोबत या यादीत एन्जल रीसे, मेट्रो बूमिन, केट रायडर, मीरा मूर्ती आणि जेम्स मेयनार्ड यांचा देखील समावेश आहे. जेव्हापासून हरमनप्रीत कौरने भारतीय महिला क्रिकेट संघाची धुरा आपल्या खांद्यावर घेतली आहे. तेव्हापासून भारतीय महिला क्रिकेट संघाने मोठी उंची गाठली आहे.
कौरच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाने २०२२ च्या राष्ट्रकुल स्पर्धेत फायनलमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर २०२३ च्या टी-२० वर्ल्डकपमध्ये भारतीय संघ सेमी फायनलमध्ये पोहोचला. याचबरोबर पहिल्या महिला प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सला विजेतेपदही पटकावून दिले. आता कौरच्या नेतृत्वाखाली भारतीय महिला संघ एशियन गेम्समध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे.
भारतीय महिला क्रिकेट संघाची एशियन गेम्समधील मोहीम ही २१ सप्टेंबरला सुरू होणार आहे. कौरच्या नेतृत्वाखालील संघात स्मृती मंधाना, जेमिमाह रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, यास्तिका भाटिया, रिचा घोष या स्टार खेळाडू खेळणार आहेत. या संघात अनुभवी आणि युवा खेळाडूंचा चांगला समतोल आहे. गेल्या दोन वर्षांपासून कौरच्या नेतृत्वाखालील संघाने चांगली कामगिरी केली आहे.