नवी दिल्ली : भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेनंतर आयसीसीने मंगळवारी महिला फलंदाजांची क्रमवारिका जाहीर केली. या क्रमवारीत भारतीय महिला संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले.
आयसीसी क्रमवारीत २५ व्या क्रमांकावर असलेल्या हरमनप्रीत कौरने १३व्या स्थानी झेप घेतली आहे. तर, सलामीवीर शेफाली वर्मा तीन स्थानांची झेप घेऊन ३३ व्या क्रमांकावर पोहोचली आहे. तसेच श्रीलंकेची कर्णधार चमारी अट्टापट्टूने टॉप १० मध्ये एन्ट्री केली आहे. आयसीसी क्रमवारीत सध्या ती आठव्या स्थानावर आहे.
श्रीलंका दौ-यावर भारताने तीन सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेत ३-० असा विजय मिळवला. या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ३४ धावांनी आणि दुस-या एकदिवसीय सामन्यात ५ विकेट्सनी विजय मिळवला. त्यानंतर अखेरच्या आणि तिस-या एकदिवसीय सामन्यात सात विकेट्सनी विजय मिळवत श्रीलंकेला क्लीन स्वीप दिला.
या मालिकेत हरमनप्रीत कौरने ११९ धावा करत तीन विकेट्स घेतल्या. ज्यामुळे आयसीसी क्रमवारीत तिला मोठा फायदा झाल्याचे पाहायला मिळाले. या क्रमवारीत यास्तिका भाटिया ४५ तर पूजा वस्त्राकर ५३ व्या स्थानी पोहोचली आहे.