भारत विरुद्ध इंग्लंड संघात सध्या कसोटी मालिका सुरु आहे. या मालिकेतील तिसरा सामना अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर (मोटेरा स्टेडियम) होणार आहे. या सामन्याआधी रविवारी भारताचा सलामीवीर रोहित शर्माने पत्रकारांशी संवाद साधला आहे. यावेळी त्याने खेळपट्टीबद्दल टीका करणाºया टीकाकारांना सडेतोड उत्तरही दिले आहे.
भारत विरुद्ध इंग्लंड संघात दुसरा कसोटी सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर पार पडला. या सामन्यासाठी वापरण्यात आलेली खेळपट्टी केवळ फिरकीला साथ देत असल्याची टीका अनेकांनी केली होती. तसेच ही खेळपट्टी कसोटी सामन्यासाठी योग्य नसल्याचीही टीका झाली होती खेळपट्टीवर टीका करणाºयांना उत्तर देताना रोहित म्हणाला, ‘खेळपट्टी दोन्ही संघांसाठी सारखीच होती. त्यामुळे मला माहित नाही खेळपट्टीबद्दल इतकी चर्चा का झाली. लोक म्हणत होते की अशाप्रकारची खेळपट्टी असू नये, पण अशी खेळपट्टी गेल्या अनेक वर्षापासून भारतात बनत असतेच.
’ रोहित पुढे म्हणाला, ‘प्रत्येक संघ मायदेशात आपल्या मजबुतीसह खेळत असतो. आम्हीही जेव्हा बाहेर जातो, तेव्हा आमच्याबरोबरही हेच होते. तेव्हा कोणी आमच्यासाठी विचार करत नाही. मग आपण का कोणाचा विचार करायचा. त्यामुळे आपण आपल्या संघाला जे योग्य ते भारतात करतो. त्यालाच मायदेशातील परिस्थितीचा फायदा घेणे म्हणतात, जर आपण हीच गोष्ट काढून टाकली तर आयसीसीला सांगा खेळपट्टी एकसारखीच असायला पाहिजे, मग ते भारतात असो ंिकवा परदेशात. त्यामुळे मला वाटते की खेळपट्टीबद्दल इतकी चर्चा होऊ नये.’
‘तुम्ही खेळाबद्दल चर्चा करा, खेळाडूबद्दल करा, पण खेळपट्टीबद्दल इतकी चर्चा योग्य वाटत नाही, कारण दोन्ही संघ एकाच खेळपट्टीवर खेळत असतात, आणि त्यावर जो चांगला खेळेल तो विजेता होतो,’ असेही रोहित म्हणाला. तसेच फलंदाज म्हणून खेळपट्टीच्या विचाराबद्दल रोहित म्हणाला, ‘एक फलंदाज म्हणून आम्ही फारसा खेळपट्टीचा विचार करत नाही.
भारत आणि इंग्लंड संघात होणारा तिसरा कसोटी सामना हा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. भारतातील हा दुसराच दिवस-रात्र कसोटी सामना आहे. याआधी कोलकाताच्या इडन गार्डन या स्टेडियमवर पहिल्यांदा भारत विरुद्ध बांगलादेश संघात दिवस-रात्र कसोटी सामना खेळवण्यात आला होता.
तसेच भारतीय संघाचा हा एकूण तिसरा दिवस-रात्र कसोटी सामना असणार आहे. याआधी भारताने आॅस्ट्रेलियामध्ये अॅडलेड येथे देखील दिवस-रात्र कसोटी सामना खेळला आहे. तर इंग्लंड संघाचा हा एकूण चौथा दिवस-रात्र कसोटी सामना असेल. या सामन्याला २४ मार्चला भारतीय प्रमाणवेळेनुसार दुपारी २.३० वाजता सुरुवात होईल़ भारत विरुद्ध इंग्लंड संघात होणारा चौथा कसोटी सामना देखील मोटेरा स्टेडियमवर होणार आहे. हा सामना सर्वसाधारण कसोटी सामना असेल. त्यामुळे हा सामना नेहमीप्रमाणे भारतीय प्रमाणवेळेनुसार सकाळी ९.३० वाजता ४ मार्चपासून सुरु होईल. त्यानंतर १२ मार्चपासून सुरु होणारी भारत आणि इंग्लंड संघातील ५ सामन्यांची टी२० मालिकाही मोटेरा स्टेडियमवर पार पडणार आहे.
– डॉ. राजेंद्र भस्मे, कोल्हापूर