अहमदाबाद : आयपीएल २०२३ च्या सामन्यात राजस्थान रॉयल्स विरुद्ध ३ विकेटने पराभव झाल्यानंतर गुजरात टायटन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या म्हणाला, खरे सांगायचे तर पॉवरप्लेनंतर मी या निकालाचा विचार केला नव्हता. कारण शेवटचा चेंडू पडे पर्यंत खेळ संपत नसतो. संघातील खेळाडूंनी हा धडा घेतला पाहिजे.
दरम्यान, विजयासाठी १७८ धावांचा पाठलाग करताना राजस्थानने पहिल्या तीन षटकांत चार धावांत दोन विकेट गमावल्या होत्या आणि पॉवरप्लेनंतर संघाची धावसंख्या अवघ्या २६ धावांवर होती. कर्णधार संजू सॅमसन (३२ चेंडूत ६० धावा) आणि शिमरॉन हेटमायर (२६ चेंडूत नाबाद ५६ यांनी मात्र वेगवान डावात चार चेंडू शिल्लक असताना संघाला विजय मिळवून दिला.
पंड्या पुढे म्हणाला, आम्ही कमी धावा केल्या. मी बाद झाल्यानंतर त्यांनी चांगली गोलंदाजी केली. आम्ही थोडे अधिक प्रयत्न करून २०० धावा केल्या असत्या. आम्ही या लक्ष्याचा चांगला बचावही करत होतो, पण मला वाटले की आम्ही १० धावा कमी पडल्या.