मुंबई : आयसीसी महिला टी-२० विश्वचषक २०२३ च्या पहिल्या सामन्यात, श्रीलंकेने यजमान दक्षिण आफ्रिकेचा ३ धावांनी पराभव करून मोठा उलटफेर केला. केपटाऊनमध्ये खेळल्या गेलेल्या ग्रुप ए सामन्यात श्रीलंकेने २० षटकांत १२९/४ धावा केल्या, ज्याला उत्तर देताना दक्षिण आफ्रिकेचा संघ १२६/९ धावाच करू शकला. श्रीलंकेची कर्णधार चमारी अटापट्टूला तिच्या ६८ धावांच्या खेळीसाठी ‘प्लेयर ऑफ द मॅच’ म्हणून गौरविण्यात आले.
नाणेफेक गमावल्यानंतर पहिल्यांदा फलंदाजी घेतल्यानंतर श्रीलंकेची सुरुवात संथ झाली कारण सातव्या षटकात हर्षिता समरविक्रमा २८ धावांवर बाद झाली. येथून चमारी अटापट्टूने विश्मी गुणरत्ने (३५) सोबत ८६ धावांची भागीदारी करत संघाला १६व्या षटकात १०० च्या पुढे नेले. मात्र, दोन्ही फलंदाज ११४ धावांवर बाद झाल्याने श्रीलंकेचा संघ १३० धावांचा टप्पा ओलांडू शकला नाही.
लक्ष्याचा पाठलाग करताना ठराविक अंतराने दक्षिण आफ्रिकेच्या विकेट पडत राहिल्याने ते मागे पडले आणि शेवटी त्यांना पराभवाचा सामना करावा लागला.
टीम इंडियाचा पहिला सामना १२ फेब्रुवारीला पाकिस्तानशी
महिला टी-२० विश्वचषकात आज गट ब मध्ये वेस्ट इंडिजचा सामना इंग्लंडशी तर अ गटात ऑस्ट्रेलियाचा सामना न्यूझिलंडशी होणार आहे. दक्षिण आफ्रिकेचा पुढचा सामना १३ फेब्रुवारीला न्यूझिलंडशी होईल, तर श्रीलंकेचा पुढचा सामना १२ फेब्रुवारीला बांगलादेशशी होईल. भारतीय संघाचा पहिला सामना १२ फेब्रुवारीला पाकिस्तानशी होणार आहे.