अहमदाबाद : दुस-या ट्वेन्टी-२० सामन्यात भारताने ७ विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. या विजयासह भारतीय संघाने पहिल्या सामन्यातील पराभवाचा बदला घेतल्याचे पाहायला मिळाले. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करताना भारतापुढे १६५ धावांचे आव्हान ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताची एकही धाव झालेली नसताना पहिला धक्का बसला. पण त्यानंतर इशान किशन आणि कर्णधार विराट कोहली यांनी धडाकेबाज फलंदाजी करत भारताच्या विजयाचा पाया रचला. या विजयासह भारताने ५ ट्वेन्टी-२० सामन्यांच्या मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली.
इंग्लंडच्या १६५ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताला पहिल्या षटकात लोकेश राहुलच्या रुपात धक्का बसला. राहुल जेव्हा बाद झाला, तेव्हा भारताची एकही धाव झाली नव्हती. पण त्यानंर किशन आणि कोहली यांनी भारताचा डाव फक्त सावरला नाही, तर त्यांनी विजयाचा पायाही रचला. कोहलीपेक्षा यावेळी पहिलाच सामना खेळणारा इशान हा अधिक आक्रमकपणे फलंदाजी करत होता. इशानला यावेळी ४० धावांवर असताना जीवदान मिळाले. बेन स्टोक्सने यावेळी इशानला जीवदान दिले. पण त्यानंतरही इशानने तुफानी फटकेबाजी सुरुच ठेवली आणि षटकारासह आपले अर्धशतक पूर्ण केले. पण अर्धशतकानंतर इशान जास्त काळ खेळपट्टीवर टिकू शकला नाही. इशानने आपल्या पहिल्याच सामन्यात ३२ चेंडूंत पाच चौकार आणि चार षटकारांच्या जोरावर ५६ धावांची
जबरदस्त खेळी साकारली.
किशन बाद झाल्यावर कोहली आणि रिषभ पंत यांनी फटकेबाजी सुरूच ठेवली. पंतने यावेळी सुरुवातीपासूनच इंग्लंडच्या गोलंदाजांचा समाचार घ्यायला सुरुवात केली. यावेळी कोहलीनेही पंतला चांगली साथ दिली. पण कोहलीपेक्षा पंत अधिक जास्त फटकेबाजी करत असल्याचे पाहायला मिळाले. पण एक मोठा फटका मारण्याच्या नादात पंत बाद झाला. पण पंतने यावेळी १३ चेंडूंत २६ धावांची जबरदस्त खेळी साकारली. पंत बाद झाल्यावर गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावलेला श्रेयस अय्यर फलंदाजीला आला. श्रेयस आणि कोहली यांची चांगली जोडी जमली. कोहलीने नाबाद ७३ धावांची खेळी करीत १७.५ षटकांत विजयावर शिक्कामोर्तब केले.
इंग्लंडच्या जेसन रॉयला राग अनावर, संतापून फेकले हेल्मेट-ग्लोव्हज
भारताविरुद्धच्या दुसºया टी-२० मॅचमध्येही जेसन रॉयने चांगली बॅटिंग केली. ३५ बॉलमध्ये ४६ रन करून जेसन रॉय आऊट झाला, पण विकेट गमावल्यानंतर रॉय चांगलाच भडकला. पॅव्हेलियनमध्ये परतताना संतापलेल्या रॉयने हेल्मेट आणि ग्लोव्हज फेकून दिले. रॉयच्या या कृतीमुळे क्रिकेट चाहते मात्र नाराज झाले. रॉयला लागोपाठ दुसºयांदा वॉशिंग्टन सुंदरने आऊट केले. सुंदरच्या बॉलिंगवर सिक्स मारण्याच्या नादात रॉयने बॉल हवेत मारला, यानंतर बाऊंड्रीवर उभ्या असलेल्या भुवनेश्वर कुमारने त्याचा कॅच पकडला.
अर्धशतकापासून रॉय ४ रन लांब राहिला. पहिल्या मॅचमध्येही त्याला अर्धशतक करता आले नव्हते. ४९ रनवर सुंदरनेच त्याची विकेट घेतली होती. त्यामुळे यंदा निराश झालेल्या जेसन रॉयने हेल्मेट आणि ग्लोव्हज फेकून दिले. जेसन रॉयच्या या वर्तणुकीमुळे चाहते त्याच्यावर नाराज झाले. काहींनी तर जेसन रॉयवर कारवाईची मागणी केली. तर जेसन रॉय लहान मुलासारखा वागत असल्याची टीकाही अनेकांनी केली.