26.9 C
Latur
Sunday, May 29, 2022
Homeक्रीडापहिल्याच वनडेत भारताचा पराभव

पहिल्याच वनडेत भारताचा पराभव

एकमत ऑनलाईन

पार्ल : पार्लच्या बोलंड पार्कवर खेळवल्या गेलेल्या पहिल्या वनडेत दक्षिण आफ्रिकेने भारताला ३१ धावांनी मात दिली. रोहित शर्माच्या अनुपस्थितीत संघाची कमान सांभाळणारा केएल राहुल या सामन्यात अचूक रणनीती आखण्यात अपयशी ठरला.

दक्षिण आफ्रिकेचा कर्णधार टेंबा बावुमाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. बावुमाने रूसी व्हॅन डर डुसेनसह केलेल्या दोनशे धावांच्या भागीदारीमुळे भारताला २९७ धावांचे आव्हान मिळाले. बावुमा आणि डुसेन यांनी शतके ठोकली. प्रत्युत्तरात भारताचा संघ ५० षटकात ८ बाद २६५ धावांपर्यंतच पोहोचू शकला. विराट कोहली, शिखर धवन आणि शेवटी शार्दुल ठाकूरने अर्धशतके झळकावली, पण मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशा केली. रूसी व्हॅन डर डुसेनला सामनावीर पुरस्कार मिळाला. या विजयासह दक्षिण आफ्रिकेने मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे.

कप्तान केएल राहुल आणि शिखर धवन यांनी भारतासाठी ४६ धावांची सलामी दिली. फिरकीपटू एडन मार्करामने राहुलला (१२) यष्टीपाठी झेलबाद करत भारताला पहिला धक्का दिला. त्यानंतर विराट कोहली मैदानात आला. धवनने विराटला सोबत घेत आपले अर्धशतक पूर्ण केले. १९व्या षटकात भारताने आपले शतक फलकावर लावले. शतकाकडे कूच करणा-या धवनला फिरकीपटू केशव महाराजने माघारी धाडले. धवनने १० चौकारांसह ७९ धावांची खेळी केली. २६ षटकात भारताने २ बाद १४० धावा केल्या. पंतनंतर ऋषभ पंत मैदानात आला. दुस-या बाजूला असलेल्या विराटने आपला फॉर्म कायम राखत अर्धशतक साजरे केले. अर्धशतकानंतर विराटला माघारी धाडण्यात फिरकीपटू तबरेझ शम्सीला यश आले. त्याने विराटला झेलबाद केले. विराटने ३ चौकारांसह ५१ धावा केल्या. विराटनंतर भारताचा डाव गडगडला. श्रेयस अय्यर (१७) मोठी खेळी करण्यात अपयशी ठरला.

वेगवान गोलंदाज लुंगी एनगिडीने त्याला बाद केले. तर ऋषभ पंत यष्टीचीत झाला. पदार्पणवीर व्यंकटेश अय्यरही (२) झेलबाद झाला. दोनशे धावांच्या आत भारताने ७ फलंदाज गमावले. त्यानंतर शार्दुल ठाकूरने अप्रतिम फलंदाजी करत चाहत्यांचे मनोरंजन केले. पण तो संघाला विजय मिळवून देण्यात अपयशी ठरला. शार्दुलने ५ चौकार आणि एका षटकारासह नाबाद ५० धावा केल्या. ५० षटकात भारतीय संघ ८ बाद २६५ धावांपर्यंतच पोहोचू शकला. आफ्रिकेकडून एनगिडी, शम्सी आणि फेहलुकवायो यांनी प्रत्येकी २ बळी घेतले.

Stay Connected

1,567FansLike
189FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या