नवी दिल्ली : टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळत आहे. रविवारी कटकमध्ये खेळल्या गेलेल्या दुस-या टी20 सामन्यात टीम इंडियाचे फलंदाज पूर्णपणे फ्लॉप ठरले. या सामन्यात एकाही भारतीय फलंदाजाला अर्धशतक करता आले नाही. कर्णधार रोहित शर्मा आणि माजी कर्णधार विराट कोहली यांच्या अनुपस्थितीत भारतीय संघाचा डाव गडगडला. नाणेफेक हारल्यानंतर फलंदाजीचा निर्णय घेतलेल्या भारतीय संघाला ६ गडी गमावून केवळ १४८ धावाच करता आल्या.
त्याचवेळी, रविवारी विराट कोहलीने सोशल मीडियावर एक फोटो शेअर केला, ज्यामध्ये तो समुद्रकिना-यावर एकटा बसलेला दिसत आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, तो पत्नी आणि मुलीसोबत मालदीवमध्ये सुट्टी घालवत आहे. काही दिवसांपूर्वी रोहित शर्मानेही मालदीवमध्ये कुटुंबासोबत सुट्टी साजरी करतानाचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता.
आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत की जर आयपीएलमध्ये खेळणारे परदेशी खेळाडू त्यांच्या राष्ट्रीय संघात सामील झाले असतील तर विराट आणि रोहितला संघात सामील होण्यात काय अडचण होती. दक्षिण आफ्रिकेचे खेळाडू डेव्हिड मिलर, कागिसो रबाडा, एनरिक नॉर्ट्या आणि ड्वेन प्रिटोरियस भारताविरुद्धच्या टी-२० मालिकेत खेळत आहेत.
हे सर्व खेळाडू आयपीएलमध्येही खेळत होते. ट्रेंट बोल्ट, टीम साऊथी आणि जॉनी बेअरस्टो हे न्यूझीलंड आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या कसोटी मालिकेत खेळत आहेत. हे खेळाडूही कढछ चा भाग होते.
त्याचवेळी राशिद खान झिम्बाब्वे आणि अफगाणिस्तान यांच्यात सुरू असलेल्या टी-20 मालिकेत खेळत आहे. जो आयपीएल चॅम्पियन गुजरात संघाचा भाग होता. निकोलस पूरन हा पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज यांच्यातील एकदिवसीय मालिकेत वेस्ट इंडिजकडून खेळत होता. ऑस्ट्रेलिया आणि श्रीलंका यांच्यातील टी-२० मालिकेतही आयपीएल खेळलेले अनेक खेळाडू उपस्थित होते. डेव्हिड वॉर्नर, ग्लेन मॅक्सवेल आणि जोस हेझलवूड हे ऑस्ट्रेलियाच्या संघात होते, पण टीम इंडियाच्या बाबतीत असे काही झाले नाही.