नवी दिल्ली : वेस्ट इंडिजविरुद्ध तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळल्यानंतर भारतीय संघ ऑगस्टमध्ये झिम्बाब्वेचा दौरा करणार आहे. या दौ-यात भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेचे वेळापत्रक समोर आले आहे.
महत्त्वाचे म्हणजे, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यात खेळली जाणारी तीन सामन्यांची टी-२० मालिका आयसीसी एकदिवसीय सुपर लीगचा भाग असेल. भारताविरुद्ध मायभूमीवर खेळली जाणारी एकदिवसीय मालिका झिम्बाब्वेसाठी अतिशय महत्त्वाची असेल. कारण, या मालिकेतील गुण पुढच्या होणा-या एकदिवसीय विश्वचषकाच्या पात्रतेसाठी मोजले जातील. भारतासाठी ही मालिका इतकी महत्त्वाची नाही. भारत अगोदरच आगामी एकदिवसीय विश्वचषकासाठी पात्र ठरला आहे.
भारतीय संघ १५ ऑगस्टला झिम्बाब्वे दौरा करण्याची शक्यता
भारतीय संघ वेस्ट इंडिज दौ-यातील अखेरचा सामना ७ ऑगस्ट २०२२ रोजी खेळणार आहे. त्यानंतर एक आठवड्यानंतर भारत झिम्बाब्वेचा दौरा करण्याची शक्यता आहे. भारत १५ ऑगस्टला झिम्बाब्वेला दाखल होऊ शकतो. ‘क्रिकबझ’ने दिलेल्या माहितीनुसार, भारत आणि झिम्बाब्वे यांच्यातील सर्व सामने हरारे स्पोर्टस् क्लबमध्ये खेळले जातील.
‘‘भारताचे यजमानपद मिळवून आम्हाला खूप आनंद झाला आहे. आम्ही स्पर्धात्मक आणि अविस्मरणीय मालिकेची वाट पाहत आहोत’’, असे झिम्बाब्वे क्रिकेटच्या एका अधिका-याने म्हटले आहे.
झिम्बाब्वे-भारत एकदिवसीय मालिकेचे वेळापत्रक
पहिला एकदिवसीय सामना- १८ ऑगस्ट २०२२ हरारे स्पोर्टस् क्लब, दुसरा एकदिवसीय सामना- २० ऑगस्ट हरारे स्पोर्टस् क्लब, तिसरा एकदिवसीय सामना- २२ ऑगस्ट हरारे स्पोर्टस् क्लब.