नवी दिल्ली : माजी भारतीय ऑफस्पिनर हरभजन सिंगने केलेल्या एका चुकीची कबुली १४ वर्षांनंतर दिली आहे. २००८ मध्ये केलेल्या चुकीवर त्याने पश्चाताप व्यक्त केला आहे. त्यावेळी मी श्रीसंतला कानशिलात लावायला नको होती. त्या दिवशी जे घडलं ते खूप चुकीचं घडलं अशी भावना त्याने यावेळी व्यक्त केली आहे.
हरभजन सिंग पुढे म्हणाला की, खेळात भावना नेहमीच तुमच्यासोबत असतात, पण त्यावर नियंत्रण ठेवावे लागते. त्या दिवशी जे काही घडले ते माझे चुकले. त्या हंगामात हरभजन सिंग हा मुंबई इंडियन्सचा खेळाडू होता, तर श्रीसंत युवराज सिंगच्या नेतृत्वाखालील किंग्ज इलेव्हन पंजाबचा भाग होता.
एका मुलाखतीत त्याने श्रीसंतवर भाष्य केले. श्रीसंतने खूप नौटंकी केली होती. मी असे करायला नको होते, ही माझी चूक होती. मी माझ्या चुकांमधून शिकलो आहे. मात्र, मी श्रीसंतला थप्पड मारली नसल्याचे या अनुभवी फिरकीपटूने सांगितले. पण चूक माझीच होती. अशा शब्दांत भज्जीने पश्चाताप व्यक्त केला आहे.
श्रीसंतने भारतासाठी २७ टेस्ट मॅचव्यतिरिक्त ५३ वनडे आणि १० टी-२० खेळले आहेत. श्रीसंतच्या नावावर इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये १६९ विकेट्स आहेत. विशेष म्हणजे २००७ मध्ये टी-२० विश्वचषक जिंकणा-या संघाचा श्रीसंत भाग होता. याशिवाय २०११ मध्ये भारतीय संघाने ५० षटकांचा विश्वचषक जिंकला तेव्हाही श्रीसंत भारतीय संघाचा भाग होता. या माजी भारतीय वेगवान गोलंदाजाने आयपीएलच्या ४४ सामन्यांमध्ये ४० विकेट घेतल्या आहेत. पंजाब किंग्जव्यतिरिक्त तो राजस्थान रॉयल्स संघाकडून खेळला आहे.