नवी दिल्ली : रविवारी भारत आणि इंग्लंड दरम्यान मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियममध्ये निर्णायक एकदिवसीय सामना झाला. या सामन्यात भारताने इंग्लंडचा पाच गडी राखून पराभव केला.
भारताच्या या ऐतिहासिक विजयानंतर अनेक माजी खेळाडूंनी सोशल मीडियाच्या माध्यमातून भारतीय संघावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यात वसिम जाफरने आपल्या खास शैलीत भारतीय संघाचे कौतुक केले आणि इंग्लंडची खिल्लीही उडवली आहे.
मँचेस्टर येथील ओल्ड ट्रॅफर्ड क्रिकेट स्टेडियममध्ये झालेल्या तिस-या एकदिवसीय सामन्यात भारताने अप्रतिम खेळ दाखवला. ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्या भारताच्या विजयाचे शिल्पकार ठरले. पंतने ११३ चेंडूत नाबाद १२५ धावांची खेळी केली. ज्यामध्ये १६ चौकार आणि दोन षटकारांचा समावेश होता.
हार्दिक पंड्यानेही ५५ चेंडूत ७१ धावा केल्या. भारताची सलामीची फळी ढेपाळल्यानंतर प्रचंड दबावात असतानाही दोघांनी कौतुकास्पद खेळ केला. वसिम जाफरने या दोघांची तुलना ‘आरआरआर’ या दाक्षिणात्य चित्रपटातील रामचरण आणि ज्युनिअर एनटीआर या दोन अभिनेत्यांशी केली आहे. त्यासाठी त्याने भन्नाट ट्वीट केले आहे.