नवी दिल्ली : भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील चौथ्या कसोटी सामन्यादरम्यान स्टार भारतीय वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीसमोर ‘जय श्रीराम’चे नारे देण्यात आले. व्हायरल व्हीडीओ पाहिला नाही असे बोलत भारतीय कर्णधार रोहित शर्माने मौन सोडले आहे.
दरम्यान, भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील बॉर्डर- गावसकर ट्रॉफीचा चौथा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. या सामन्यादरम्यान स्टेडियममधील काही व्हीडीओ व्हायरल झाले होते. या व्हीडीओंबाबत कोणत्याही प्रकारचे अधिकृत वक्तव्य आलेले नसले तरी टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने आता या व्हीडीओंबाबत वक्तव्य केले आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने खुलासा केला आहे की, त्याने असा कोणताही व्हीडीओ पाहिला नाही किंवा त्याच्याकडे या घटनेची कोणतीही माहिती नाही. सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्मा म्हणाला की, मला याबाबत कोणतीही माहिती नाही. मी हे पहिल्यांदाच ऐकले आहे आणि तिथे काय झाले ते मला माहीत नाही.
सामन्याबद्दल बोलायचे झाले तर भारताने ही मालिका २-१ अशी जिंकली आहे. भारतीय संघाचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध कसोटी क्रिकेटमधील हा सलग चौथा मालिका विजय आहे. या विजयासह भारताने आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही आपले स्थान निश्चित केले आहे. ७ जून रोजी लंडनच्या ओव्हल स्टेडियमवर डब्ल्यूटीसी फायनलमध्ये भारताचा सामना ऑस्ट्रेलियाशी होणार आहे.