23.6 C
Latur
Tuesday, July 27, 2021
Homeक्रीडाभारतीय फलंदाजीला जेमिसनमुळे खिंडार

भारतीय फलंदाजीला जेमिसनमुळे खिंडार

एकमत ऑनलाईन

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना १९ जूनपासून इंग्लंडमधील साऊथम्पटनच्या मैदानावर चालू आहे. न्यूझिलंडचा कर्णधार केन विलियम्सनने नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केले. गोलंदाजांना अनुकूल असलेल्या वातावरणात भारतीय फलंदाजी फार काळ तग धरू शकली नाही.

रोहित शर्मा(३४) व शुभमन गिल(२८)ने ६२ धावांची चांगली सलामी मिळाली परंतु भारताला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. शुभमन गिल व चेतेश्वर पुजारा यांच्या हेल्मेटवर दोनदा चेंडू आदळला पण काही नुकसान झाले नाही तर गिल एकदा धावबाद होता होता वाचला. न्यूझिलंडचे जलदगती गोलंदाज ड्यूक्स चेंडूवर खेळपट्टीकडून चांगलीच मदत मिळवत होते़ टीम साऊदी, ट्रेंट बोल्ट, काईले जेमिसन व नील वँगनरनी दोन्ही इन स्विंगर व आऊट स्विंगरचे सुरेख प्रदर्शन केले. चेतेश्वर पुजाराला जास्त धावा (५४ चेंडूत फक्त ८ धावा) काढता आल्या नाहीत पण त्याने जवळपास दहा षटकं खेळून काढली़ त्यानंतर कर्णधार व उपकर्णधार जोडीने भारताची धावसंख्या पहिल्या दिवसाखेर ६४.४ षटकांत तीन बाद १४६ पर्यंत नेऊन ठेवली.

प्रत्येक दिवशी ९८ षटकांचा खेळ करण्याचे ठरले होते़ पण सोमवारीही जवळजवळ तीस षटकांचा खेळ पावसामुळे वाया गेला. दुस-या दिवशी टीम इंडियाचा डाव ३०० वर नेण्याची मोठी व कठीण जबाबदारी कर्णधार व उपकर्णधारावर होती पण ते जमले नाही. कोहली (४४) आणि अजिंक्य रहाणे(४९) बाद झाल्यानंतर अश्विन (२२) व जडेजा (१५) शिवाय इतर कुठल्याही भारतीय फलंदाजाला मोठी धावसंख्या करता आली नाही. भारतीय संघाचा पहिला डाव २१७ धावांवर संपुष्टात आला. पहिल्या दिवशी भारत मजबूत स्थितीत होता मात्र दुस-या दिवशी किवी गोलंदाजांनी पुनरागमन करत भारतीय संघाला अवघ्या २१७ धावांवर सर्वबाद केले.

यात सगळ्यात मोठा वाटा होता, तो वेगवान गोलंदाज कायले जेमिसनचा. त्याने तब्बल पाच बळी घेत भारताची फलंदाजी फळी कापून काढली. पहिल्या दिवशी एक विकेट घेणा-या जेमिसनने दुस-या दिवशी मात्र चार विकेट पटकावल्या. यात भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या महत्त्वपूर्ण विकेटचा देखील समावेश होता. जेमिसनने भारताचा दहाव्या क्रमांकावरील फलंदाज जसप्रीत बुमराला बाद करत डावातील पाचवा बळी मिळवला. यासह त्याने बळींचे पंचक देखील पूर्ण केले. जेमिसन ऑन हॅट्ट्रिक होता पण इशांत शर्माने हॅट्ट्रिक वाचवली. त्याचा हा केवळ आठवा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना आहे. अवघ्या आठ कसोटी सामन्यांत पाचव्यांदा बळींचे पंचक पूर्ण करणारा जेमिसन न्यूझिलंडचा पहिलाच गोलंदाज ठरला.

जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या दिवशी ६५ षटकांचाच खेळ होऊ शकला होता. तर दुस-या दिवशी फक्त ७८ षटकांचा खेळ झाला. जवळजवळ ३२ मिनिटांचा खेळ अंधुक प्रकाशामुळे वाया गेला़ दुस-या दिवसाची सुरुवात झाली तेव्हाही भारतीय संघ सामन्यात पुढे असल्याचे चित्र होते. परंतु, न्यूझिलंडचा उंचापुरा वेगवान गोलंदाज कायले जेमिसनने हे चित्र काही वेळातच पालटले.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वांत तंदुरुस्त क्रिकेटपटूंमध्ये कोहलीचे नाव सर्वांत पुढे असते. फिटनेसचा फायदा त्याला क्षेत्ररक्षण करत असताना होत असतो. या सामन्यात कोहली अर्धशतक पूर्ण करण्यास अपयशी ठरला. परंतु, त्याने कव्हरमध्ये उंच उडी मारून एक अप्रतिम झेल टिपून सर्वांचेच मन जिंकले. प्रत्युत्तरात न्यूझिलंड संघाने ३४ षटके होईपर्यंत एकही गडी गमावला नव्हता. डेवॉन कॉनवे आणि टॉम लॅथम (१०४ चेंडूत ३०) हे दोघेही टिच्चून फलंदाजी करत होते. त्यावेळी कोहलीने आऱ अश्विनला गोलंदाजी करण्यासाठी बोलवले. अश्विननेही कर्णधाराला निराश केले नाही. अश्विनने दुसरा चेंडू टाकला, ज्यावर लॅथमने कव्हर ड्राईव्ह मारण्याचा प्रयत्न केला होता. परंतु तो चेंडू थेट कव्हरच्या दिशेने क्षेत्ररक्षण करत असलेल्या कोहलीच्या हातात गेला. ईशांत शर्माने डेवॉन कॉनवेचा बळी घेत विक्रम केला पण जागतिक कसोटीत अर्धशतक (१५४ चेंडूत ५४) करणारा कॉनवे हा पहिला फलंदाज ठरला. न्यूझिलंडचा डाव ११६ धावांनी पिछाडीवर आहे़

वीज बिल भरल्यावरच कर्मचा-यांना पगार मिळणार

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
199FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या