नवी दिल्ली : जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत भारताची स्टार भालाफेकपटू अण्णू राणीच्या हाती निराशा लागली. अंतिम फेरीत अण्णू राणीचे पदक थोडक्यात हुकले. राणी सातव्या क्रमांकावर राहिली. जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत तिस-यांदा सहभागी होत असलेल्या अण्णूने सलग दुस-यांदा जागतिक ऍथलेटिक्स स्पर्धेची अंतिम फेरी गाठली होती.
अण्णू राणीने अंतिम स्पर्धेत ६१.१२ मीटर भालाफेक करून सातवे स्थान पटकावले. या स्पर्धेत सुवर्णपदक ऑस्ट्रेलियाच्या केल्सी ली बार्बरला मिळाले, तिने ६६.९१ मीटर भालाफेक करून सुवर्णपदक जिंकले. रौप्यपदक अमेरिकेच्या कारा विंगरला मिळाले तर कांस्यपदक जपानच्या हारुका किटागुचीला मिळाले.
अण्णू राणीच्या सहा प्रयत्नांमध्ये तिचा दुसरा प्रयत्न सर्वोत्कृष्ट होता. दुस-या प्रयत्नात त्याने ६१.१२ मीटर अंतरावर भालाफेक केली. अनू राणीने गुरुवारी जागतिक अॅथलेटिक्स चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत ५९.६० मीटर थ्रो करून पात्र ठरली होती. तिने ब गटातील पात्रता फेरीत पाचवे स्थान पटकावले आणि दोन्ही गटांतील आठव्या सर्वोत्तम प्रयत्नाच्या जोरावर ती अंतिम फेरीसाठी पात्र ठरली होती.