कोल्हापूर : कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधवची आशियाई टेनिस फेडरेशनच्या वतीने इंग्लंडमध्ये होणा-या विम्बल्डन स्पर्धेसाठी आशियाई संघात निवड झाली आहे. या संघात निवड झालेली ऐश्वर्या जाधव भारतातील एकमेव टेनिसपटू आहे.
राजधानी नवी दिल्लीमध्ये झालेल्या वर्ल्ड ज्युनिअर टेनिस स्पर्धेतून आशियाई संघाची निवड करण्यात आली. यामध्ये १४ वर्षांखालील गटातील दोन मुले आणि दोन मुलींची निवड करण्यात आली आहे.
निवड झालेल्या संघामध्ये ऐश्वर्यासह जपानची अझुना इचीओका, कझाकिस्तानची झांगर नुरलानुली आणि कोरियाची सी हॅयुक चो यांचा समावेश आहे. ऐश्वर्या कोल्हापूर जिल्हा लॉन टेनिस असोसिएशनची खेळाडू आहे. ती छत्रपती शाहू विद्यालयात शिकते. ऐश्वर्याला प्रशिक्षक अर्शद देसाई, मनाल देसाई आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.
कोल्हापूरची टेनिसपटू ऐश्वर्या जाधव सातत्याने ऐतिहासिक कामगिरी करत आहे. फॉर्ममध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर १३ वर्षीय ऐश्वर्याने अंडर-१४ श्रेणीमध्ये प्रथम क्रमांकावर पोहोचण्याची कामगिरी केली आहे.