28.9 C
Latur
Wednesday, January 20, 2021
Home क्रीडा कोलकाताने गुणांचे खाते उघडले

कोलकाताने गुणांचे खाते उघडले

एकमत ऑनलाईन

सुरेख गोलंदाजी आणि शुभमन गिलच्या संयमी फलंदाजीच्या जोरावर कोलकाता नाईट रायडर्स संघाने आयपीएलच्या तेराव्या मोसमातील पहिल्या विजयाची नोंद केली. त्यांनी शनिवारी अबुधाबी येथे झालेल्या सामन्यात सनरायझर्स हैदराबाद संघाचा ७ गडी राखून पराभव केला.हैदराबादला अजूनही खाते उघडता आलेले नाही.

आतापर्यंतच्या ७ सामन्यांत नाणेफेक करणा-या कर्णधारांनी प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला होता. या सामन्यात हैदराबाद संघाचा कर्णधार डेव्हिड वॉर्नरने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला पण तो त्याच्या पथ्यावर पडला नाही. हैदराबाद संघाचा डाव ४ बाद १४२ असा मर्यादित राहिला. मनीष पांडेचे अर्धशतकच त्यांच्या डावाचे वैशिष्ट्य ठरले. त्यानंतर कोलकाता नाईट रायडर्स संघाने १८ षटकांत ३ बाद १४५ धावा केल्या. शुभमन गिल ६२ चेंडूंत ५ चौकार, २ षटकारांसह ७० धावांची खेळी करून नाबाद राहिला. इयॉन मॉर्गनने २९ चेंडूंत नाबाद ४२ धावा करताना ३ चौकार, २ षटकार लगावले. गोलंदाजीतील अचूकता हाच या सामन्यातील सर्वांत मोठा फरक ठरला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी घेतल्याचा फायदा हैदराबाद संघाला उठवता आला नाही.

…चर्चा तर होणारच !

आयपीएलमधील कोलकाताची तिस-या क्रमांकाची निचांकी धावसंख्या होती. आतापर्यंत निचांकी धावसंख्येचा पाठलाग करताना प्रत्येक संघ जिंकला आहे. मात्र, त्यांना थोड्याफार प्रमाणात झगडावे लागते. कोलकाताची स्थिती काहीशी अशीच होती. सुनील नारायणला सलामीचा अट्टाहास कधीतरीच बरोबर ठरत असूनही त्यातून कोलकाता काही धडे घेत नाही. या वेळीही नारायण लगेच बाद झाला. शुभमन गिल आणि नितीश राणा ही जोडी जमली असे वाटत असतानाच फुटली. राणा १३ चेंडूंत २६ धावा काढून बाद झाला. लगोलग कर्णधार दिनेश कार्तिकही बाद झाला. नारायणप्रमाणे त्यालाही भोपळा फोडता आला नाही. ६.२ षटकांत ३ बाद ५३ अशा स्थितीत शुभमन गिल आणि इयॉन मार्गन जोडी जमली. त्यातही गिलने इतका वेळ राखलेला संयम तोडला आणि थोडी आक्रमकता दाखवत आपले अर्धशतक पूर्ण केले. मॉर्गनही नेहमीप्रमाणे वेगात खेळला. अर्धशतकानंतर गिलला रोखणे हैदराबादला जड गेले आणि कोलकाताने श्वास रोखण्याकडे वळणारा सामना अगदी सहज जिंकला. गिल-मॉर्गन जोडीने ७० चेंडूंत ९२ धावांची भागीदारी केली.

जॉनी बेअरस्टॉला झटपट बाद करण्यात यश आल्यावर कोलकाता संघाने नियोजनबद्ध गोलंदाजी करून हैदराबादचे फलंदाज वरचढ ठरणार नाहीत याची काळजी घेतली. त्यानंतर डेव्हिड वॉर्नर, वृद्धिमान साहा यांनी तिशीत मजल मारली. मनीष पांडेने अर्धशतक नोंदवले. पण, त्यांच्या खेळीत जोश नव्हता. ते कधीच हैदराबादच्या डावाला वेग देऊ शकले नाहीत.

अभिजात, भावस्पर्शी स्वर!

त्याउलट कोलकाता संघाची कामगिरी मैदानावर आपल्याला जिंकायचेच असे ठरवून आल्यासारखी होती. त्यांचे नियोजन कुठेही चुकले नाही. पॅट कमिन्सने सलामीची जोडी फोडली. मधल्या षटकांत फिरकी गोलंदाजांनी वर्चस्व राखले. हे कमी पडले म्हणून शेवटी आंद्रे रसेलही भाव खाऊन गेला. दिनेश कार्तिकने फलंदाजांना बुचकळ्यात टाकण्यासाठी तब्बल सात गोलंदाजांचा वापर केला. त्यामुळे कुणाविरुद्ध आक्रमक व्हायचे हे हैदराबादच्या फलंदाजांना समजलेच नाही.

मैदानाबाहेरून
डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,413FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या