18.9 C
Latur
Friday, October 22, 2021
Homeक्रीडाकोलकात्याचा थरारक विजय, दिल्लीला धक्का

कोलकात्याचा थरारक विजय, दिल्लीला धक्का

एकमत ऑनलाईन

शारजाह : आयपीएल २०२१ चा दुसरा क्वालिफायर सामना बुधवारी दिल्ली कॅपिटल्स (डीसी) आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात रंगला. प्रथम फलंदाजी करताना दिल्लीची घसरण झाली. त्यामुळे कोलकात्याचा सहज विजय होईल, असे वाटत असतानाच मधल्या फळीतील फलंदाज ढेपाळल्याने अखेरच्या षटकात ६ बॉल ६ धावा अशी स्थिती झाली होती. त्यात अश्विनने दोन विकेट घेतल्याने २ बॉल ६ धावा अशी स्थिती झाली होती. त्यावेळी राहुल त्रिपाठीने अश्विनला षटकार ठोकून थरारक विजय मिळवित अंतिम फेरीत धडक मारली. आता दस-या दिवशी कोलकात्याचा संघ चेन्नईशी भिडणार आहे.

शारजाह क्रिकेट स्टेडियमवर दुस-या क्वालिफायरमध्ये कोलकाता आणि पहिल्या क्वालिफायरमध्ये पराभूत झालेली दिल्ली यांच्यात लढत रंगली. कोलकाताचा कप्तान ईऑन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. संथ खेळपट्टीचा परिणाम आणि कोलकाताच्या गोलंदाजांनी केलेल्या भेदक मा-यासमोर दिल्लीला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. त्यामुळे २० षटकात ५ बाद १३५ धावाच करता आल्या. दिल्लीकडून शिखर धवन आणि पृथ्वी शॉ यांनी सलामी दिली. पृथ्वीने चांगली सुरुवात केली, पण पाचव्या षटकात फिरकीपटू वरुण चक्रवर्तीने त्याला पायचित पकडले. पृथ्वीने २ चौकार आणि एका षटकारासह १८ धावा केल्या.

आठव्या षटकात धवनसोबत मार्कस स्टॉइनिसने दिल्लीचे अर्धशतक पूर्ण केले. शारजाहच्या संथ खेळपट्टीवर दिल्लीला आपला वेग वाढवता आला नाही. १० षटकात दिल्लीने १ बाद ६५ धावा केल्या. १२ व्या षटकात वेगवान गोलंदाज शिवम मावीने स्टॉइनिसची दांडी गुल केली. अडखळत सुरुवात केलेल्या स्टॉइनिसने २२ चेंडूत १८ धावा केल्या. त्यानंतर धवनने चक्रवर्तीला मोठा फटका खेळण्याच्या नादात शाकिबकडे झेल दिला. धवनने ३९ चेंडूत ३६ धावा केल्या. शतक पूर्ण होण्याच्या आधीच दिल्लीने आपला पाचवा गडी शिमरोन हेटमायरच्या रुपात गमावला होता. पण वरुण चक्रवर्तीचा चेंडू नोबॉल ठरला. पण या जीवदानाचा हेटमायरला फायदा उचलता आला नाही. १९ व्या षटकात हेटमायर धावबाद झाला. शेवटच्या षटकात श्रेयस अय्यर आणि अक्षर पटेलने शिवम मावीला १५ धावा कुटल्या. दिल्लीने २० षटकात ५ बाद १३५ धावा केल्या. अय्यरने नाबाद ३० धावा केल्या.

त्यानंतर मैदानात उतरलेल्या कोलकाताचे सलामीवीर शुभमन गिल आणि व्यंकटेश अय्यर यांनी पहिल्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. परंतु त्यांच्यानंतर एकाही फलंदाजाला मोठी धावसंख्या उभारता आली नाही. दिनेश कार्तिक, कर्णधार मॉर्गन शाकिब अल हसन, सुनील नरेन शुन्यावर बाद झाले. त्यामुळे सा-या आशा राहुल त्रिपाठीवर खिळल्या होत्या. त्यात अखेरच्या षटकात ६ धावा असताना दोन महत्त्वाच्या विकेट गमावल्या. त्यामुळे एकवेळ २ चेंडू ६ धावा अशी अवस्था झाली होती. त्यावेळी सुनील नरेन झेलबाद झालेला असताना त्रिपाठी धावत आला आणि त्याने पाचव्या चेंडूला षटकार ठोकून १ चेंडू व ३ विकेट राखत विजयावर शिक्कामोर्तब केले. त्यामुळे कोलकात्याच्या संघाने थेट अंतिम फेरीत धडक मारली. आता दस-याच्या दिवशी १५ ऑक्टोबर रोजी कोलकात्याचा संघ अंतिम लढतीत थेट चेन्नईशी भिडणार आहे. त्यामुळे यावेळी कोणता संघ चॅम्पियन ठरणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,527FansLike
195FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या