नवी दिल्ली : लक्ष्य सेनने इंडियन ओपन पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावले आहे. इंडियन ओपन बॅडमिंटन सुपर ५०० या स्पर्धेत पदार्पणातच पुरुष एकेरीचे विजेतेपद पटकावणारा लक्ष्य सेन पहिला भारतीय ठरला.
रविवारी नवी दिल्ली येथे झालेल्या रोमांचक अंतिम सामन्यात त्याने विद्यमान विश्वविजेत्या लोह कीन य्यूचा २४-२२, २१-१७ असा पराभव केला. लक्ष्यने ५४ मिनिटे चाललेल्या या सामन्यात सिंगापूरच्या लोहला धूळ चारली आहे. लक्ष्य सेनने पराभूत केलेल्या लोहने किदाम्बी श्रीकांतचा डिसेंबरमध्ये पराभव करून जागतिक विजेतेपद पटकावले होते.इंडिया ओपन बॅडमिंटन सुपर ५०० स्पर्धेतील लक्ष्यचे हे पहिले विजेतेपद आहे. याआधी २०२१ च्या वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये सेमीफायनलमध्ये श्रीकांतकडून पराभूत झाल्यानंतर त्याने कांस्यपदक जिंकले होते.
लक्ष्यने पहिल्या गेममध्ये १६-१० अशी आघाडी घेतली होती आणि लोहने १९-१९ अशी बरोबरी साधली होती. लक्ष्यने २४-२२ असा विजय मिळवण्यापूर्वी या जोडीने मॅच पॉइंट्सची देवाणघेवाण केली. दुसरा गेम बरोबरीत सुटला पण लक्ष्यने १९-१७ अशी आघाडी घेत सलग दोन गुण मिळवून सामना आणि विजेतेपद जिंकले.
दरम्यान, भारतीय खेळाडूंनी यंदा इंडिया ओपन बॅडमिंटन सुपर ५०० स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केली आहे. चिराग-सात्विक जोडीने पुरुष दुहेरी स्पर्धा जिंकली आहे, तर लक्ष्य सेनने एकेरीचे विजेतपद पटकावले आहे. लक्ष्य सेन याप्रकारे सुपर ५०० मध्ये विजय मिळवणारा तिसरा भारतीय पुरुष ठरला आहे. याआधी १९८१ मध्ये प्रकाश पादुकोण आणि २०१५ मध्ये किदाम्बी श्रीकांत यांनी सुपर ५०० चॅम्पियनशिप स्पर्धा जिंकली होती.