नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी भाजपच्या निलंबित प्रवक्त्या नुपूर शर्मा यांचा जगभर निषेध केला जात आहे. तर दुस-या बाजूला असे ही काही लोक आहेत जे तिला पाठिंबा देत आहेत. यात भारताच्या माजी क्रिकेटपटूंचा देखील समावेश आहे.
भारताचा माजी क्रिकेटपटू वेंकटेश प्रसादने नुपूर शर्माला पांिठबा दिलाय. बेळगावात एका मशिदीबाहेर नुपूरच्या पुतळ्याला फाशी देण्याच्या घटनेवर प्रसादने प्रतिक्रिया दिली आहे. मला विश्वास बसत नाहीय की हा २१व्या शतकातील भारत आहे, असे म्हणत प्रसादने एका पाठोपाठ एक ट्विट केले आहेत. यावर काही लोकांनी प्रसादला टार्गेट करण्याचा प्रयत्न केल्यावर प्रसादने देखील सडेतोड उत्तर दिले.
नुपूरच्या पुतळ्याला फाशी देण्याचा फोटो शेअर करत प्रसाद म्हणतो, हा कर्नाटकमधील नुपूर शर्माचा लटकवण्यात आलेला पुतळा आहे. विश्वास बसत नाहीय की हा २१व्या शतकातील भारत आहे. मी सर्वांना विनंती करतो की राजकारण सोडा आणि थोडे जागृक व्हा. हे थोड अधिक झाले.
त्यानंतर आणखी एक ट्विटमध्ये प्रसाद म्हणतो, या ट्विटचा जो अर्थ आहे तो अविश्वसनीय आहे. या परिस्थितीला बातम्या देणा-या वृत्तवाहिन्या आणि अशा गोष्टांना बरोबर ठरवणारे लोक देखील जबाबदार आहेत. हा फक्त एक पुतळा नाही तर अनेक लोकांसाठी धोका आहे.
आणखी एका ट्विटमध्ये प्रसादने म्हटले आहे की, … आणि जर या गोष्टीमुळे लोकांच्या भावना दुखवल्या जात असतील तर देशात अशा लोकांची यादी न संपणारी आहे. जेव्हा देशात पत्रकारांपासून ते लोकप्रतिनिधींपर्यंत आणि मुख्य वृत्तपत्रांपासून ते मुख्य चित्रपट सृष्टीतील स्टारपर्यंत हिंदू देवतांची चेष्टा करतात. तेव्हा नेहमीच सहिष्णुता दाखवली गेली आहे.