नाशिक : डेहराडून येथे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) तर्फे आयोजित राष्ट्रीय पातळीवरील महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेत महाराष्ट्राने विदर्भ संघाचा पराभव केला आहे. १९ वर्षांखालील महिलांच्या महाराष्ट्र संघाकडून खेळताना नाशिकच्या ईश्वरी सावकार हिने या सामन्यात घणाघाती दीडशतक झळकावले.
नाशिकच्या महिला क्रिकेटपटूने राष्ट्रीय पातळीवरील महिला स्पर्धेत कर्णधारपद भूषविताना थेट दीडशतक झळकावत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाची कर्णधार ईश्वरीने १५५ चेंडंूत २० चौकार, एक षटकार ठोकत १५१ धावा फटकावल्या.
यामुळे महाराष्ट्राने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ५० षटकांत ५ बाद २७७ अशी धावसंख्या उभारली. ईश्वरीला के. एन. मुल्लाने नाबाद ५८ धावांची साथ दिली. उत्तरादाखल विदर्भाला ५० षटकांत ८ बाद १८५ इतकीच मजल मारता आल्याने महाराष्ट्राने ईश्वरी सावकारच्या नेतृत्वात ९३ धावांनी मोठा विजय मिळवला.
नाशिकची अष्टपैलू शाल्मली क्षत्रियदेखील महाराष्ट्र संघात असून तिने दोन षटकांत ९ धावा दिल्या. डेहराडून येथे खेळल्या जात असलेल्या या स्पर्धेत १९ वर्षांखालील महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी निवड सार्थ ठरवत ईश्वरी सावकारने विजयी सुरुवात केली. महाराष्ट्र संघाने अरुणाचल, पुद्दुचेरीपाठोपाठ गोवा संघावर ९ गडी राखून जोरदार विजय मिळवला होता.