24.4 C
Latur
Sunday, October 2, 2022
Homeक्रीडावर्ल्डकपच्या आधी क्रिकेटच्या नियमांत मोठे बदल

वर्ल्डकपच्या आधी क्रिकेटच्या नियमांत मोठे बदल

एकमत ऑनलाईन

मुंबई : ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये सुरू होणा-­या टी -२० विश्वचषकापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा निर्णय घेतला आहे. १ ऑक्टोबर २०२२ पासून क्रिकेटमध्ये काही नवीन नियम लागू होणार आहेत. या बदललेल्या नियमांनुसार यंदाचा टी-२० विश्वचषक खेळवला जाईल. सौरव गांगुलीच्या नेतृत्वाखालील पुरुष क्रिकेट समितीच्या शिफारशी मंजूर झाल्यानंतर या नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत.

आयसीसीच्या नवीन नियमांनुसार, झेलबाद झाल्यावर फक्त नवीन फलंदाजच फलंदाजी करेल. यापूर्वी जेव्हा एखादा फलंदाज झेलबाद झाला आणि त्याने नॉन स्ट्रायकर फलंदाजाला ओलांडले तर त्या परिस्थितीत नॉन स्ट्राईक एंडला नवा फलंदाज येत असे पण आता स्ट्राईक बदलूनही नवा फलंदाजच स्ट्राईक घेईल.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयसीसीने गेल्या दोन वर्षांपासून चेंडूवर लाळ लावण्यास बंदी घातली होती. आता या नियमावर कायमची बंदी घालण्यात आली आहे. म्हणजेच आता पुढील नियम बदलेपर्यंत कोणताही गोलंदाज चेंडूला लाळ लावू शकणार नाही. बॉल पॉलिश न करण्याचा नियम २०२० मध्ये लागू करण्यात आला होता.

स्ट्राईक घेण्यासाठी फक्त २ मिनिटांचा अवधी
आता फलंदाजाला कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये दोन मिनिटांत फलंदाजी करण्यासाठी सज्ज व्हावे लागेल, तर टी-२० फॉरमॅटमध्ये ही वेळ फक्त ९० सेकंद असेल. याआधी कसोटी आणि एकदिवसीय सामन्यांमध्ये ही वेळ ३ मिनिटांची असायची आणि जेव्हा फलंदाज वेळेत फलंदाजीसाठी येत नसे त्यावेळेस क्षेत्ररक्षण करणारा कर्णधार टाईम आऊट घेत असे.

चूक फिल्डरची, धावा फलंदाजाला
क्षेत्ररक्षणाच्या वेळी खेळाडूने जर फलंदाजाचे लक्ष विचलित करण्यासाठी कोणते कृत्य केले किंवा जाणूनबुजून चुकीचे हावभाव, वर्तन केले तर दंड म्हणून फलंदाजाला पाच धावा दिल्या जातील. आधी या चेंडूला डेड बॉल म्हटले जायचे आणि फलंदाजाचा फटका रद्द केला जात असे.

खेळपट्टीवरूनच फलंदाजी
जर एखादा चेंडू खेळपट्टीपासून दूर पडला, तर फलंदाजाला आता खेळपट्टीवरच थांबावे लागेल. जर फलंदाज खेळपट्टीच्या बाहेर गेला तर अम्पायर त्याला डेड बॉल देईल. ज्या चेंडूवर फलंदाज खेळपट्टी सोडून शॉट खेळण्यास जाईल, त्या चेंडूला नो बॉल दिला जाईल.
वन डे मध्येही स्लो ओव्हर रेटचा नियम
स्लो ओव्हर रेटचा नियम जानेवारी २०२२ मध्ये टी- २० फॉरमॅटमध्ये लागू करण्यात आला होता, ज्यामध्ये स्लो ओव्हर रेटसाठी संघांना दंड आकारण्यात आला होता. आता हा नियम वनडेमध्येही लागू होणार आहे.

Stay Connected

1,567FansLike
188FollowersFollow
SubscribersSubscribe

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

लोकप्रिय बातम्या