24.6 C
Latur
Saturday, January 16, 2021
Home क्रीडा मुंबईने पंजाबला रोखले

मुंबईने पंजाबला रोखले

एकमत ऑनलाईन

बंगळुरूविरुद्ध २०६, राजस्थानविरुद्ध २२३ धावांचा डोंगर रचणा-या पंजाबला मुंबईने दीडशेच्या आत गुंडाळले.या विजयामुळे मुंबईने गुणतक्त्यात सहाव्यावरून अव्वल स्थानावर उडी घेतली. तर पंजाब सहाव्या स्थानावर गेले. आयपीएलच्या तेराव्या मोसमात मुंबई इंडियन्सने अबुधाबीवर झालेल्या तेराव्या सामन्यात पंजाबचा ४८ धावांनी पराभव केला.
प्रथम फलंदाजी करताना मुंबई इंडियन्स संघाला अडचणीच्या स्थितीतून अखेरीस २० षटकांत ४ बाद १९१ अशी आव्हानात्मक मजल मारता आली. यात रोहित शर्माच्या ७० धावांना किएरॉन पोलार्ड आणि हार्दिक पांड्याकडून मिळालेल्या आक्रमक साथीचा वाटा होता. किंग्ज इलेव्हनचा डाव ८ बाद १४३ असा राहिला. निकोलस पूरनच्या ४४ धावा वगळता पंजाबचा एकही फलंदाज खेळपट्टीवर टिकून उभा राहू शकला नाही. मुंबईच्या जसप्रित बुमरा, जेम्स पॅटिन्सन, राहुल चहर या प्रत्येकाने दोन गडी बाद केले.

नाणेफेक जिंकून मुंबई संघाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित करण्याचा पश्चाताप पंजाब संघाला निश्चित झाला. अखेरच्या षटकातील खराब गोलंदाजीमुळे त्यांना सामन्यावरील पकड गमवावी लागली. मुंबईची सुरुवात चांगली झाली नव्हती. किंटॉन डी कॉक आणि सूर्यकुमार यादव हे फलंदाज झटपट बाद झाले. त्या वेळी कर्णधार रोहित शर्मा आणि ईशान किशन या एकत्रित आलेल्या जोडीने तिस-या विकेटसाठी ६२ धावांची भागीदारी केली. त्यानंतरही पंजाबची गोलंदाजी चांगली होत होती. शेल्डन कॉट्रेल याने आपली चार षटके अचूक टाकली. शमीने देखील फलंदाजांची कसोटी पाहिली. मात्र, त्यांचे अन्य गोलंदाज लय मिळवू शकले नाहीत. यातही जिमी निशामच्या तिस-या षटकात २२ धावा फटकावल्या गेल्या. यामुळे मुंबईच्या फलंदाजांना स्थिरावण्यास मदत झाली. त्यानंतर पोलार्ड आणि पांड्या यांनी फटकेबाजीत मुंबईचे आव्हान भक्कम केले.

रोहितने दोन धावा घेत आयपीएलमध्ये पाच हजार धावांचा टप्पा गाठला. त्यानंतर त्याने सामन्यात ४५ चेंडूंत ८ चौकार आणि तीन षटकारांसह ७० धावांची खेळी केली. आयपीएलमध्ये पाच हजारहून अधिक धावा करणारा रोहित तिसरा भारतीय ठरला. यापूर्वी विराट कोहली आणि सुरेश रैना यांनी अशी कामगिरी केली आहे. पोलार्डने २० चेंडूंत नाबाद ४७ धावांची खेळी करताना ३ चौकार आणि ४ षटकार ठोकले. पांड्यानेही ११ चेंडूंत ३० धावांचा तडाखा दिला. त्याने ३ चौकार आणि २ षटकार लगावले. हाणामारीच्या शेवटच्या तीन षटकांत पंजाबच्या गोलंदाजांनी तब्बल ६२ धावा दिल्या आणि त्याच त्यांना महाग पडल्या आयपीएलच्या तेराव्या सत्रात शतक करणारे दोन्ही सलामीवीर पंजाबचे होते पण त्यांना मुंबईविरुद्ध सूर गवसला नाही.

आव्हानाचा पाठलाग करताना मयांक अगरवाल (२५), लोकेश राहुल (१७)जोडीने पंजाबला पाच षटकांत ३९ धावांची सलामी दिली. मात्र, जसप्रित बुमराला गोलंदाजी मिळाल्यावर त्याने आपल्या पहिल्याच षटकात मयंक अगरवालचा त्रिफळा उद्ध्वस्त केला. त्यानंतर कृणाल पांड्याने करुण नायरला बाद केले. राहुलचा अडथळा पॅटिन्सनने दूर केला. प्रमुख फलंदाज असे झटपट बाद होत असताना निकोलसने (२७ चेंडूत ४४) फटकेबाजी केली. पण, तो धावांच्या वाढत्या समीकरणाचे दडपण पेलू शकला नाही. फटकेबाजीच्या नादात तो बाद झाला. तोच नाही, तर नंतर आलेल्या पंजाबच्या प्रत्येक फलंदाजाची अवस्था काहिशी अशीच झाली होती. मुंबईच्या गोलंदाजांनी त्यांच्याभोवती अचूकतेचा फास आवळला आणि त्यांचा डाव १४३ वर रोखला. शेवटी कृष्णाप्पा गौतमने १३चेंडूत नाबाद २२ धावा करत पराभवाचे मार्जिन कमी केले.

डॉ. राजेंद्र भस्मे
कोल्हापूर, मो. ९४२२४ १९४२८

मृत्यू होणारा प्रत्येक दहावा रुग्ण भारतातला

ताज्या बातम्या

आणखीन बातम्या

1,408FansLike
122FollowersFollow
SubscribersSubscribe

लोकप्रिय बातम्या