दुबई : आयपीएल २०२० च्या अंतिम सामन्यात सामन्यात दिल्ली कपिटल्स चा ५ विकेट्सने पराभव करत मुंबई इंडियन्सने इतिहास रचला. हे मुंबईचे पाचवे आयपीएल विजेतेपद ठरले. मुंबई इंडियन्सने याआधी २०१३, २०१५, २०१७ आणि २०१९ ला आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. याआधी कोणत्याच संघाला ५ वेळा विजेतेपद मिळवता आलेले नाही.
अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सला दिल्ली कॅपिटल्सने १५७ धावांचे आव्हान दिले होते. या आव्हानाचा पाठलाग मुंबई इंडियन्सने १८.४ षटकात ५ विकेट्स गमावत पूर्ण केला. मुंबईकडून कर्णधार रोहित शर्माने ५१ चेंडूत ६८ धावा करत अर्धशतकी खेळी केली. तर इशान किशनने नाबाद ३३ धावा केल्या. त्याचबरोबर क्विंटन डिकॉकने २०, सुर्यकुमार यादवने १९ धावांची खेळी करत मुंबईच्या विजयात खारीचा वाटा उचलला.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणाऱ्या दिल्ली कॅपिटल्सने २० षटकात ७ विकेट्स गमावत १५६ धावा केल्या होत्या. त्यांची सुरुवात खराब झाली होती. सलामीला आलेला मार्कस स्टॉयनिस शुन्यावरच बाद झाला. मात्र नंतर रिषभ पंत आणि कर्णधार श्रेयस अय्यरने दिल्लीचा डाव सांभाळताना चौथ्या विकेटसाठी ९६ धावांची भागीदारी केली. तसेच या दोघांनी अर्धशतकेही पूर्ण केली. पंतने ३८ चेंडूत ४ चौकार आणि २ षटकार मारत ५६ धावा केल्या. तर अय्यरने ५० चेंडूत नाबाद ६५ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार मारले. त्यांच्याव्यतिरिक्त कोणत्याही फलंदाजाला २० धावांचा टप्पा पार करता आला नाही.
जेतेपद राखणारा चेन्नईनंतर दुसराच संघ
मुंबई इंडियन्सचा संघ जेतेपद राखणारा चेन्नई सुपरकिंग्सनंतरचा दुसरा संघ ठरला आहे. याआधी चेन्नई सुपरकिंग्सने २०१० व २०११ या सालांमध्ये आयपीएल जिंकण्याची करामत केली होती. आता मुंबई इंडियन्सने रोहीत शर्माच्या नेतृत्वात २०१९ व २०२० सालांमध्ये ही स्पर्धा जिंकण्याचा करीष्मा करून दाखवला आहे.