नवी दिल्ली : राफेल नदालने पुन्हा एकदा विम्बल्डनच्या अंतिम-१६ मध्ये धडक दिली आहे. विम्बल्डनच्या अंतिम १६ मध्ये पोहोचण्याची त्याची ही दहावी वेळ आहे.
त्याने तिस-या फेरीत इटलीच्या लोरेन्झो सोनेगोचा सरळ सेटमध्ये पराभव करत नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. नदालने दोन वेळा म्हणजेच २००८ आणि २०१० मध्ये विम्बल्डनचे विजेतेपदही जिंकले आहे.
यंदाच्या स्पर्धेत तो विजयाचा प्रबळ दावेदार मानला जात आहे.
विम्बल्डन २०२२ च्या तिस-या फेरीत नदालने लोरेन्झोचा ६-२, ६-१, ६-४ असा पराभव केला. या सामन्यात राफेल नदालने एकहाती विजय मिळवला. लोरेन्झोने गेल्या वेळी विम्बल्डनची चौथी फेरी गाठली होती. विशेष म्हणजे, या स्पर्धेतील पुढच्या फेरीत नदाल कशी कामगिरी करतोय? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विम्बल्डन २०२२ स्पर्धेच्या चौथ्या फेरीत नदालचा सामना २१ व्या मानांकित डच खेळाडू बोटिक व्हॅन डी गेंडशल्पशी होणार आहे. त्याने तिस-या फेरीत अनुभवी खेळाडू रिचर्ड गॅस्केटचा ७-५, २-६, ७-६ (९/७), ६-१ असा पराभव केला. गेल्या महिन्यात फ्रेंच ओपनमध्येही नदाल आणि बोटिक आमने-सामने आले होते. या सामन्यात नदालचे वर्चस्व पाहायला मिळाले. त्याने सहज बोटिकचा पराभव केला.